माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी अनंतात विलीन

Pranab Mukherjee.jpg

दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee) (८४) यांच्या पार्थिवावर आज (मंगळवारी) लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सोमवारी लष्कराच्या रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांना १० ऑगस्टला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांना कोरोनाची लागणही झाली होती. मुखर्जी यांच्या निधनाबद्दल केंद्र सरकारने देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.

प्रणव मुखर्जी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या दिल्लीतील १०, राजाजी मार्ग येथील निवासस्थानी ठेवण्यात आले होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी घरी जाऊन मुखर्जी यांना अभिवादन केले. तसेच उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत आणि तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांनीही प्रणव मुखर्जी यांचे अंत्यदर्शन घेतले.

कोविड-१९ च्या प्रोटोकॉलनुसार, माजी राष्ट्रपतींचे पार्थिव अंत्यसंस्कारांसाठी गन कॅरेजऐवजी शववाहिकेतून लोधी रोड येथील स्मशानभूमीत नेण्यात आले. येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आल्याने सर्व सार्वजनिक इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आले आहेत.

 बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER