माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड

Manmohan Singh

जयपूर : राजस्थान येथून माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. या जागेसाठी मनमोहन यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपताच मनमोहन यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. राजस्थानमध्ये राज्यसभेची केवळ एकच जागा होती.

भाजपने मनमोहन सिंग यांचा सन्मान राखत त्यांच्याविरुद्ध भाजपचा उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. राजस्थान विधानसभेतील विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी त्याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे मनमोहन सिंग यांची बिनविरोध निवड होणार हे आधीपासूनच निश्चित झाले होते. आज त्याबाबतची औपचारिकता पूर्ण झाली आहे.

दरम्यान मनमोहन सिंग यांची राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मनमोहन सिंग यांचे अभिनंदन केले आहे.

मनमोहन सिंग राजस्थानातून राज्यसभेवर जाणं ही राज्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे गेहलोत म्हणाले. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही मनमोहन यांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्याकडे असलेल्या प्रचंड अनुभवाचा व ज्ञानभांडाराचा निश्चितच सभागृहाला फायदा होईल, असे या ट्विटमध्ये नमूद करण्यात आले आहे.