माजी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचा देवेंद्र फडणवीसांना सल्ला

Fadnavis-Eknath Khadse

मुंबई :राज्यात ठाकरे सरकार स्थापन झाल्यानंतर दोन दिवसाचे विधीमंडळ अधिवेशन झाले. या अधिवेशनात बहुमत चाचणी, विधीमंडळ नेता. विरोधी पक्षनेता निवडीची परंपरा पार पडली. यावेळी कॉंग्रेसचे आमदार नाना पटोले यांची विधीमंडळ नेतापदी निवड झाली तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. विधानसभेत विरोधी पक्षनेत्याच्या अभिनंदनाचा ठराव झाला. त्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी याबाबत प्रतिक्रिया देतांना माजी मुख्यमंत्री आताचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे कान टोचले आहे.

“विरोधीपक्ष नेत्याने केवळ प्रसिद्धीसाठी सरकारवर आरोप करु नयेत. पुरव्यासहित संपूर्ण अभ्यास करुनच सरकारवर आरोप केले पाहिजेत,” असा सल्ला एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

एकनाथ खडसे शिवसेनेत येणार? राऊत म्हणतात…

“विरोधी पक्षनेत्याकडून होणाऱ्या आरोपांचे त्याच्याकडे पुरावे असले तर त्याच्या बोलण्याला अधिक महत्व प्राप्त होते. आरोप करताना पुरावे देण्याची काळजी विरोधी पक्षनेत्याने घ्यायला हवी. विरोधी पक्षनेत्याचे पद हे शिष्टाचारानुसार मुख्यमंत्र्यांच्या खालोखाल असते. हा नेता उद्याचा सत्ता बदल घडवून आणणार नेता आहे या दृष्टीकोनातून त्याच्याकडे पाहिले जाते. त्यामुळेच सरकारला जाब विचारून जनतेची कामे करून घेणे, ही विरोधी पक्षनेत्याची प्रमुख जबाबदारी असते,” असं मत खडसेंनी व्यक्त केलं.