एमआयएम वंचितच्या मागे ईडी का लागत नाही ; माजी खासदाराचा प्रश्न

Eknath Gaikwad

मुंबई ः ‘भाजपच्या जातीयवादी, लोकशाहीविरुद्ध धोरणाला विरोध करणाऱ्यांना देशद्रोही ठरविले जाते. ईडी, सीबीआय मागे लावली जाते. पण मग एमआयएम, वंचित बहुजन आघाडी यांच्या मागे ईडी का लागत नाही?,’ असा प्रश्न माजी खासदार आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी केला आहे.

एकनाथ गायकवाड यांनी यावेळी भाजपकडून होणाऱ्या ईडी (ED) आणि सीबीआयच्या (CBI) राजकीय वापरावरही त्यांनी कडाडून टीका केली. तसेच, ‘या पक्षांमुळं भाजपाला फायदा होतो. हे पक्ष काँग्रेसची मतं खातात आणि भाजपला निवडून देतात. निवडून आल्यानंतर भाजप द्वेष आणि जातीयवाद पसरवितो, असा आरोपही त्यांनी केला.

गायकवाड यांनी यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यावरही टीका केली. ‘संविधानामुळेच मी पंतप्रधान झालो असं मोदी सांगतात. भाषणात डॉ. आंबेडकरांचं नाव घेतात आणि काम मात्र संविधानाच्या विरुद्ध करतात. त्याविरुद्ध आज कोणताही पक्ष, कोणताही नेता लढताना दिसत नाही. फक्त काँग्रेसचे नेते राहुल गांधी एकटे लढत आहेत. म्हणून राहुल गांधी यांच्या बाजूनं उभे राहा. सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष फक्त काँग्रेसच आहे हे जगाला दाखवून द्या,’ असं आवाहनही त्यांनी केलं.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनाचं औचित्य साधून काँग्रेस नेते शिवकुमार लाड यांच्या वडाळा येथील संपर्क कार्यालयाचं उद्घाटन एकनाथ गायकवाड यांच्या हस्ते रविवारी झालं. त्यावेळी ते बोलत होते.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. बेस्ट समिती सदस्य राजेश ठक्कर, कार्यालयीन प्रभारी कुतुबुद्दीन सय्यद, जिल्हाध्यक्ष हुकुमराज मेहता यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER