पवारांना गुरू मानणाऱ्या मोठ्या नेत्याचा समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार अस्तित्वात येताच राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू झाले आहे. आता गंगाखेड विधानसभेचे तीन वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व करणारे माजी आमदार सीताराम घनदाट (Sitaram Ghandat) व त्यांचे नातू जिल्हा परिषद सदस्य भरत घनदाट यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला. सहकार क्षेत्रातील आघाडीच्या नावांपैकी एक असलेल्या सीताराम घनदाट यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

माजी आमदार घनदाट यांनी परभणीमधील गंगाखेड मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले होते. तसेच ते अभ्युदय सहकारी बँकेचे मानद अध्यक्ष आहेत.घनदाट यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी दरम्यान राष्ट्रवादीतील नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून त्यांना गंगाखेडची विधानसभेची उमेदवारी देण्याचा मानस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा होता.

मात्र राष्ट्रवादीचे तत्कालीन विद्यमान आमदार मधुसूदन केंद्रे यांचा पत्ता कट करून घनदाट यांना उमेदवारी मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे तेव्हाचा घनदाट यांचा राष्ट्रवादी प्रवेश स्थगित राहिला. मात्र आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना घनदाट म्हणाले की, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना मी राजकीय गुरू मानत आलेलो आहे. एवढी वर्षे राजकारणात राहिलो; पण पवारांच्या तोडीचा कुठलाही नेता मला दिसून आला नाही. मला कुठल्याही पदाची अपेक्षा नसून, आता केवळ पक्षवाढीसाठी काम करणार असल्याचे ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER