भाजपच्या धमकीला न जुमानता माजी आमदाराचा असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश

former-mla-rajiv-aawale-kolhapur-joined-ncp-presence-ajit-pawar

मुंबई :- जनसुराज्य पक्षाचे नेते आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजीव आवळे (Rajiv Aawale) यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचे स्वागत करून पक्षात घेतले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पायाला भिंगरी बांधल्यासारखे पवारसाहेब आज काम करत आहेत.

या वयातही प्रचंड काम करणारा नेता देशात दुसरा कुणी नाही हे नाकारता येणार नाही. केंद्र असो किंवा राज्य सरकार, विकासकामांमध्ये कुणीही राजकारण करून नये किंवा अडथळा आणू नये. माझ्या अनेक वर्षांच्या राजकीय जीवनात पवारसाहेबांची ५०-५५ वर्षांची राजकीय कारकीर्द पाहिलेली आहे. मी ३० वर्षे राजकीय क्षेत्रात काम करतोय. मी कधीही विकासकामात राजकारण आणलं नाही. उलट मदतच करत असतो, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

यावेळी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार असून आमची मदत करण्याची भूमिका असणार आहे. आता कोल्हापूर जिल्ह्यात पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायतीमध्ये अधिक सदस्य कसे निवडून येतील असे काम करावे लागणार आहे. सर्व जातीधर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचे काम राष्ट्रवादी करत आहे. दोन्ही खासदार निवडून देणारा हा जिल्हा आहे. पक्षावर आणि पवारसाहेबांवर प्रेम करणारा हा जिल्हा आहे, याची आठवणही अजित पवार यांनी करून दिली.

जे आज पक्षात प्रवेश करत आहेत त्यांची विविध विकासकामे करण्यासाठी मदत करू. राजीव आवळे हे जनसुराज्य पक्षाचे आता नाहीत.  त्यांना पक्षाने तिकीट न दिल्यामुळे त्यांनी बंडखोरी करून अगोदरच राजीनामा दिला होता. त्यामुळे ते सध्या तरी अपक्ष आहेत. त्यांचा दांडगा संपर्क लक्षात घेता पक्षाला त्यांची चांगली मदत होणार आहे. भाजपाने धमक्या दिल्या होत्या आणि प्रवेश करून घेतला होता, ते सर्व आज राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. त्याची सुरुवात आज राजीव आवळे यांच्या प्रवेशाने होत आहे, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपाला लगावला.

दरम्यान, ताकद वाढविण्यासाठी हा कार्यक्रम महत्वाचा आहे. कोल्हापूर (Kolhapur) जिल्हयात आणखी चांगली संघटना वाढवूया. इचलकरंजी, हातकणंगले या भागातील बर्‍याच प्रश्नांना दादांनी न्याय दिला आहे. राजीव आवळे यांचासारखा एक चांगला माणूस आपल्या पक्षात येत आहे त्याबद्दल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी स्वागत केले. तर आपलेपण राष्ट्रवादीत मिळालं आहे. भविष्यात राष्ट्रवादीचा उतराई होण्यासाठी राष्ट्रवादीशिवाय दुसरं काम करणार नाही असं स्पष्ट करतानाच २०२१ मध्ये राज्यातील मातंग समाजात राष्ट्रवादीचा झेंडा फडकवल्याशिवाय गप्प बसणार नाही असे आश्वासन माजी आमदार राजीव आवळे यांनी प्रवेश करताना दिले. येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा विचार जनतेपर्यंत पोहचविण्यात कमी पडणार नाही. राष्ट्रवादीशिवाय आपल्याला यापुढे पर्याय राहणार नाही असंही राजीव आवळे यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER