माजी आमदार नामदेवराव भोईटे यांचे निधन

Namdevrao Bhoite

कोल्हापूर : राधानगरी-भुदरगडचे माजी आमदार नामदेवराव भोईटे यांचे आज, मंगळवारी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व सहकार क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने वेगळा ठसा उमटवणारे व्यक्तिमत्त्व त्यांच्या निधनाने काळाच्या पडद्याआड गेले आहे. गेले काही दिवस त्यांच्यावर कोल्हापुरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. अंत्यदर्शनासाठी पालकरवाडी येथील भोईटे हायस्कूलमध्ये दुपारी २ पर्यंत पार्थिव ठेवले जाणार आहे.

त्यानंतर कसबा वाळवे गावात अंत्ययात्रा काढली जाणार असून, सायंकाळी ५ च्या सुमारास पालकरवाडी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. पालकरवाडी (ता. राधानगरी) येथे एका सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. सुरुवातीला शिक्षक असलेले नामदेवराव भोईटे नंतर राजकीय क्षेत्रात सक्रिय झाले. प्रथम राधानगरी पंचायत समितीवर ते निवडून गेले. पंचायत समितीचे सभापती म्हणून त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. त्यातूनच काँग्रेसतर्फे ते जिल्हा परिषदेवर निवडून गेले.

अभ्यासू सदस्य म्हणून त्यांनी जिल्हा परिषद गाजवली. त्यातूनच त्यांनी राधानगरी-भुदरगड मतदारसंघातून काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती; पण काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले व विजय मिळविला. अपक्ष असतानाच त्यांनी शिवसेनेला सरकार स्थापण्यासाठी पाठिंबा दिला होता. सध्या ते मुदाळ येथील हुतात्मा वारके सहकारी सूत गिरणीचे अध्यक्ष होते. तालुक्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शिक्षण संस्था उभ्या राहिल्या आहेत.