
पुणे : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. पी. परदेशी यांनी हा आदेश दिला. ज्येष्ठ दांपत्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली जाधव सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
जाधव यांनी औंध येथे ज्येष्ठ दांपत्याला १४ डिसेंबर रोजी सायंकाळी मारहाण केली होती. या प्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात अमन चड्डा यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी खुनाचा प्रयत्न (भादंवि कलम ३०७) नुसार गुन्हा दाखल करून जाधव यांना अटक केली. सुरुवातीला पोलीस कोठडी, त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावली.
जाधव यांनी ऍड. जहिरखान पठाण यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जास सहायक सरकारी वकील व्ही. सी. मुरळीकर यांनी विरोध केला. हा गंभीर गुन्हा असून, जामीन देऊ नये, असा युक्तिवाद ऍड. मुरळीकर यांनी केला. न्यायालयाने तो मान्य केला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला