राष्ट्रवादीचा भाजपला पुन्हा धक्का? घरवापसीसाठी माजी आमदाराची अजितदादांसोबत चर्चा

पुणे : पुण्यातील भाजपचे १९ नगरसेवक राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असतानाच आता भाजपचा एक बडा आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणाऱ्या भाजपच्या या बड्या माजी आमदाराने राष्ट्रवादीत घरवापसी करण्याचा निर्णय घेतला आहे. या नेत्याने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेऊन त्यांच्याशी पक्षप्रवेश करण्याबाबत चर्चा केल्याची माहिती पुढे येत आहे.

त्यामुळे हा भाजपचा माजी आमदार कोण? याबाबत पुण्यात जोरदार चर्चा रंगली आहे. भाजपच्या या माजी आमदाराने ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपच्या गोटात सहभागी झाला होता. मात्र, भाजपमध्ये जाऊन फारसा फायदा झाला नसल्याने त्यांनी  घरवापसी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी मुंबईत अजित पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची इच्छा बोलून दाखवली. मात्र, अजित पवारांनी या माजी आमदाराला पक्षात प्रवेश द्यायचा की नाही याबाबतचा निर्णय स्थानिक कार्यकर्त्यांकडे सोपवला आहे.

या माजी आमदाराने पक्षात प्रवेश केल्यास त्याचा राष्ट्रवादीला मोठा फायदा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, हा माजी आमदार कधी आणि केव्हा पक्षात प्रवेश करणार हे गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. तसेच या आमदाराचे नावही गुलदस्त्यात ठेवण्यात आल्याने हा आमदार कोण? याबद्दल पुण्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER