भाजपात इनकमिंगला सुरूवात: मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेला धक्का, माजी आमदार भाजपात

Trupti Sawant - Pravin Darekar - Devendra Fadnavis - Nitesh Rane - Maharashtra Today

मुंबई :- ऐन मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या विधानसभेच्या बंडखोर उमेदवार आणि माजी आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. वांद्रे पूर्व या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं निवासस्थान असलेल्या मतदारसंघात, तृप्ती सावंत यांनी शिवसेनेचं प्रतिनिधीत्व केलं होतं. मात्र त्यांनीच आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी माध्यमांशी संवाद साधताना, येणाऱ्या काही दिवसात शिवसेनेला असे अनेक धक्के खावे लागणार असल्याचे सांगितले. काही निष्ठावान शिवसैनिक आघाडी सरकारच्या कामामुळे आणि होणाऱ्या आरोपामुळे व्यथित झाले आहेत. बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली जात असल्याने खरे शिवसैनिक दुखी झाले आहेत. येणाऱ्या काळात आपल्याला असे अनेक शिवसैनिक भाजपमध्ये येत असल्याचे दिसून येईल, असा दावाही दरेकर यांनी केला.

तर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाल्याचे आमदार नितेश राणे म्हणाले. सरकारच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहे. दोन मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. पुढे आणखी काही मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निष्ठावान शिवसैनिकांना डावलण्याचे काम करत असल्याने, अनेक पदाधिकारी, शिवसैनिक खूप नाराज आहे. येणाऱ्या दिवसात अनेकजण भाजपात येतील,असा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तृप्ती सावंत यांचं तिकीट कापून, शिवसेनेने तत्कालिन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मतदारसंघातील शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला होता. इथे काँग्रेसचा उमेदवार झिशान सिद्दीकी यांनी बाजी मारली.

त्याआधी 2015 मध्ये आमदार बाळा सावंत यांचं निधन झाल्याने, शिवसेनेने पोटनिवडणुकीत तृप्ती सावंत यांना तिकीट दिलं होतं. त्यावेळी त्यांच्याविरोधात नारायण राणे होते. मात्र तृप्ती सावंत यांनी बाजी मारुन विधानसभेत प्रवेश केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button