मशिदी उघडण्याच्या मागणीसाठी राज्य अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष राज्यपालांच्या भेटीला

former-minority-commission-chairman-meets-governor

मुंबई : राज्य सरकारने सर्वांसाठी मशिदी उघडण्याची परवानगी द्यावी, या प्रमुख मागणीसाठी भाजप नेते आणि महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. राज्य सरकारकडे मशिदींमध्ये सर्वांना नमाज अदा करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती त्यांनी केली. राजभवन येथे शिष्टमंडळाचे नेतृत्व करीत शेख यांनी राज्यपालांना एक पत्र सोपवले.

राज्यपालांनी हस्तक्षेप करत सरकारला मशिदींसह सर्व धार्मिक स्थळे सुरू करण्यास परवानगी देण्याची सूचना करावी, असे पत्रात नमूद केले  गेले आहे. राज्यातील रेस्टॉरंट्स, बार आणि वाईनची दुकाने खुली आहेत. परंतु मशिदी आणि इतर धार्मिक ठिकाणी लोकांना एकत्रित प्रार्थना करण्यास परवानगी नाही. त्यांना सामाजिक अंतराचे पालन करून प्रार्थना करण्याची परवानगी देण्यात यावी. तसेच आठवड्यात सर्व दिवस जर प्रार्थनेची परवानगी नसेल तर किमान शुक्रवारच्या प्रार्थनेस परवानगी द्यावी, अशी मागणीही अराफत शेख यांनी केली.

सध्या मशिदींच्या प्रशासनाशी संबंधित केवळ पाच लोकांना नमाज पठण करण्याची परवानगी आहे. शुक्रवारची प्रार्थना खूप महत्त्वाची  आहे. आता आम्हाला महामारीच्या भीतीने काही काळ जगायचं आहे आणि आम्ही त्याबरोबर जगण्याची सवय लावत आहोत, असेही ते म्हणाले. टाळेबंदीच्या काळात सर्व धार्मिक स्थळांवर वाईट परिणाम झाला आहे. लोकांना नमाजला परवानगी नसल्यामुळे मशिदी आणि दर्ग्यांना मिळणाऱ्या देणग्या थांबल्या आहेत.

शुक्रवारी नमाज अदा करणाऱ्यांकडून मशिदींना देणग्या मिळतात. परंतु शुक्रवारीही अनेक लोकांना मशिदींना जाण्याची परवानगी नसल्यामुळे शुक्रवारी मिळत असलेल्या देणग्यांमध्ये कमालीची घट झाली आहे. मशिदीत काम करणाऱ्या कर्मचार्‍यांना देण्यासाठी पैसे नाहीत. जर लोक वाईन शॉप्स आणि रेस्टॉरंट्समध्ये सामाजिक अंतर राखू शकतात तर ते मशिदींमध्येही करू शकतात, असेही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER