
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी.एन देशमुख यांच्या निधनाने राज्य एका व्यासंगी विधीतज्ज्ञाला मुकले आहेच परंतू श्रमिकांच्या न्याय्य हक्कासाठी आपल्या वकिली पेशाच्या माध्यमातून लढणारे एक कणखर व्यक्तिमत्त्वही काळाच्या पडद्याआड गेले आहे अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
मुख्यमंत्री पुढे म्हणतात की सामाजिक प्रश्नांवर ऐतिहासिक निर्णय देणारे न्यायमूर्ती म्हणून श्री. देशमुख यांना अवघा महाराष्ट्र आणि देश ओळखतो. त्यांनी सर्वोच्च न्यायालयातही वकिली केली. औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ उभारण्यात श्री. देशमुख यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. सुरुवातीपासून वकिली करतांना त्यांनी समाजातील उपेक्षितांचा, कष्टकऱ्यांचा आवाज म्हणूनच काम करणे पसंत केले. उस पिकवणारा शेतकरी असो किंवा कोणताही कष्टकरी त्यांच्या न्याय्य हक्काची जपणूक करण्याला त्यांनी प्राधान्य दिले त्याअनुषंगिक निर्णय घेतले.
ही बातमी पण वाचा : माजी न्यायमूर्ती बॅ. बी. एन. देशमुख यांचं निधन
त्यांच्या निधनाने विधीक्षेत्राची जशी हानी झाली आहे तसेच सामाजिक क्षेत्राचेही मोठे नुकसान झाले आहे. आपल्या आमदारकीच्या काळात त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले होते असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला