आरोग्य तपासणीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना पिटाळून लावणारा माजी नगरसेवक पोलिसांच्या ताब्यात

Arrested

रत्नागिरी/प्रतिनिधी : रत्नागिरी शहरातील राजीवडा भागात कोरोनाचा रुग्ण सापडल्यामुळे येथे आरोग्य तपासणीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना पिटाळून लावणाऱ्या माजी नगरसेवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राजीवडा येथे कोरोना बाधित रुग्ण सापडल्यावर राजीवडा परिसर सील करण्यात आला आहे.

शनिवारी सकाळी आरोग्य खात्याने येथील सर्व नागरिकांची तपासणी करण्यासाठी आशा वर्कर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची टीम पाठवली आहे. या आरोग्य कर्मचाऱ्यांना येथे तपासणी करण्यासाठी एका माजी नगरसेवकाने अटकाव केला. येथे तपासणीसाठी आलात तर येथील माहोल बिघडवला जाईल अशी धमकीदेखील दिली.

त्यामुळे या पथकांनी पोलिसांशी संपर्क साधला. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी कणखर भूमिका घेत राजिवडा गाठले व येथील जनतेला पुन्हा एकदा आवाहान केले. आरोग्य पथकांना अटकाव करणाऱ्या माजी नगरसेवकाची पोलिसी भाषेत कानउघाडणी करत या माजी नगरसेवकाला व एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले.

या या घटनेचे चोरून व्हिडीओ शुटींग करणाऱ्याला चांगलाच प्रसाद देण्यात आला. अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड या सर्वांनी पुन्हा एकदा नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.