माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जामीन मंजूर

Former CM Devendra Fadnavis granted bail

नागपूर :- माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नागपूर सत्र न्यायालयात सुनावणीसाठी हजर झाले आहेत. त्यांना कनिष्ठ न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे .२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी अर्ज भरताना दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयात खटला चालवण्याची गरज नसल्याचा निकाल उच्च न्यायालयाने दिला होता. त्याविरोधात वकील सतीश उके यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर गेल्या ऑक्टोबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल रद्दबातल केला होता. दरम्यान कनिष्ठ न्यायालयात खटला चालवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर फडणवीस यांनी फेरविचार याचिका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दाखल केलेल्या फेरविचार याचिकेवरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राखून ठेवला. नागपूर न्यायालयानं समन्स बजावल्यानं आज देवेंद्र फडणवीस न्यायालयासमोर हजर झाले. त्यांच्यासोबत माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा नेते परिणय फुकेदेखील उपस्थित होते.

न्यायालयानं १५ हजारांच्या जातमुचलक्यावर फडणवीस यांना जामीन मंजूर केला. यानंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. संबंधित केस संपल्यानं त्यांचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात केला नव्हता, असं सांगितलं. या खटल्याची पुढील सुनावणी ३० मार्चला होणार आहे .