भाजपचे माजी आमदार मनसेच्या वाटेवर, समर्थकांसाठी मिसळ पार्टीचं आयोजन

Raj Thackeray - Vasant Gite

नाशिक :- नाशिक महापालिका निवडणुकांच्या तोंडावर जिल्ह्यात राजकीय बदलाचे वारे वाहू लागले आहेत. आधी बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला रामराम ठोकत भाजपात घरवापसी केली. त्यानंतर भाजपमधील एक गट नाराज असल्याची चर्चा रंगली होती. त्यातच आता भाजप नेते आणि माजी आमदार वसंत गिते (Vasant Gite) हे मनसेत घरवापसी करण्याच्या विचारात असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांनी समर्थकांसाठी ‘मिसळ पार्टी’चं आयोजन केलं आहे. त्यामुळे गिते ‘मिसळी’च्या निमित्ताने पक्षांतराचा ‘कट’ शिजवणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

भाजपच्या (BJP) प्रदेश सरचिटणीस पदावरुन उचलबांगडी करत कार्यकारिणी सदस्यपद दिल्याने वसंत गिते नाराज असल्याची चर्चा आहे. वसंत गिते यांनी नववर्षाच्या मुहूर्तावर समर्थकांसाठी मिसळ पार्टीचं आयोजन केलं आहे. ‘मिसळ डिप्लोमसी’च्या निमित्ताने ते दुसऱ्या पक्षात जाण्याची चाचपणी करत असल्याचं बोललं जातं. कार्यकर्ते, समर्थक यांच्याशी चर्चा करुन वसंत गिते पुढची दिशा ठरवणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, भाजपमध्ये गेलेले वसंत गितेंच्या मिसळ पार्टीला हजेरी लावू नये, असे आदेश मनसे जिल्हाध्यक्षांनी काढले आहेत. पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना गितेंच्या पार्टीला न जाण्यास मनसेने फर्मावलं आहे. वसंत गितेंसमोर सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे पर्याय खुले आहेतच. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत घरवापसी करण्याबाबतही ते विचार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या संभाव्य नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वसंत गिते पक्षांतराचा मुहूर्त साधण्याची चिन्हं आहेत.

ही बातमी पण वाचा : राज ठाकरेंसोबत ‘नो पंगा’, डॉमिनोजने मनसेच्या मागणीची घेतली तात्काळ दखल; लवकरच मराठीत अप्लिकेशन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER