फडणवीसांबाबत केलेल्या विधानावरून जोरदार राडा; भाजपच्या माजी आमदाराला मारहाण

बुलडाणा :- शिवसेना (Shivsena) आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याविरोधात केलेल्या विधानाचा निषेध करणे भाजपच्या माजी आमदाराला महागात पडले आहे. संजय गायकवाड यांचा पुतळा जाळत असताना शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. यावेळी झालेल्या मारहाणीत भाजपच्या माजी आमदाराच्या डोळ्याला जबर मार लागल्याने मोठी दुखापत झाली. डोळ्याला सुजणही आली आहे. या घटनेमुळे बुलडाण्यात तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना खालची पातळी गाठली होती. त्यामुळे भाजप नेते माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी योगेंद्र गोडे, सिद्धार्थ शर्मा यांच्यासह भाजपच्या (BJP) असंख्य कार्यकर्त्यांनी काल जयस्तंभ चौकात येऊन गायकवाड यांच्या विधानाचा निषेध व्यक्त केला. यावेळी त्यांनी गायकवाड यांचा पुतळा जाळण्यास सुरुवात केली. तेव्हा गायकवाड यांचे चिरंजीव कुणाल गायकवाड यांनी त्याला विरोध केला. कुणाल यांनी भाजप कार्यकर्त्यांना विरोध केल्याने दोन्ही गटांत शाब्दिक चकमक उडून प्रकरण हाणामारीवर आलं. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या डोळ्याला जबर मार लागल्याने त्यांचा डोळा सुजला. या घटनेची माहिती मिळताच बुलडाणा शहर पोलीस आणि शीघ्र कृती दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहचले.

दरम्यान, पोलीस आणि जवानांनी दोन्ही गटाला पिटाळून लावत तत्काळ परिस्थितीवर ताबा मिळवला. दोन्ही गटांतील हाणामारी थांबली असली तरी परिसरात तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील वातावरण अजूनही तापलेलं आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा लावण्यात आला आहे. या दोन्ही गटांवर संचारबंदीचा भंग, आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथरोग नियंत्रण कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

ही बातमी पण वाचा : फडणवीस-दरेकर यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button