नवी मुंबईतील भाजपचे नाराज माजी नगरसेवक शिवसेनेच्या दरबारी

Shivsena-BJP

नवी मुंबई : नवी मुंबईतील (Navi Mumbai) भाजपचे (BJP) काही माजी नगरसेवक शिवसेनानेत्याच्या (Shiv Sena) दरबारी पोचल्याने एकच चर्चा रंगली आहे. भाजपमधील काही माजी नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामांना भाजपचेच नेते आडवे होत आहे. त्यामुळे नाराज असलेल्या या माजी नगरसेवकांनी शिवसेना नेत्याच्या दरबारी हजेरी लावली. एवढंच नाही तर या माजी नगरसेवकांच्या मदतीला शिवसेना नेते धावून येत आहेत. तसेच त्यांच्या प्रभागातील विकास कामे एका झटक्यात करून देत असल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे.

नवी मुंबईतील सेना-भाजपच्या या अघोषित युतीमुळे शहरात या नव्या चर्चेला उधाण आले आहे. यापूर्वीच नवी मुंबईतील भाजप नगरसेवकांचा एक गट नाराज आहे. त्याच्या प्रभागातील कामे सत्ता असताना देखील होत नव्हती. फक्त मर्जीतल्या नगरसेवकांचीच कामे होत असल्याने नाराज नगरसेवक अस्वस्थ होते. याबाबतची तक्रार नागपूरच्या भाजपच्या दरबारापर्यंत पोहचली होती. त्या वेळी या सर्व नाराजांना धीर देण्यात आला. मात्र, या ताज्या घटनेनंतर देखील परिस्थिती सुधारत नाही हे पाहता आणि जर का प्रभागातील विकास झाले नाहीत तर निवडणुकांमधून निवडून कसं यायचं असा प्रश्न हे नाराज नगरसेवक व्यक्त करत आहेत.

आता नवी मुंबईच्या महापालिकेत प्रशासकाची नियुक्ती असल्याने याचीच संधी साधत या नगरसेवकांनी थेट शिवसेना नेत्यांच्या दरबारीच हजेरी लावली आणि आपल्या प्रभागातील कामे करून घेतली. या कामांमधून नाराज नगरसेवकांचा फायदा झालाच पण शिवसेनेच्या नेत्यांनी ही या कामांमधून आपलं ही चांगलंच चांगभलं करून घेतलं असल्याची चर्चाही रंगली आहे. मात्र, या नाराज नगरसेवकांची नाराजी आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने महत्वाची ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER