शैक्षणिक शुल्क माफ करा, अन्यथा परिणामांना सामोरे जा; राष्ट्रवादीचा इशारा

NCP - Education Fee - Maharashtra Today

मुंबई :- महाराष्ट्रात वाढत असलेल्या कोरोना रूग्णसंख्येला आळा घालण्यासाठी मागील दीड वर्षांपासून राज्यात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. यामुळे उद्योग व्यावसायासह शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. मात्र ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली अनेक शाळांकडून शैक्षणिक शुल्क आकारले जात आहे. उद्योग-व्यवसाय बंद पडल्याने अनेकांचे रोजगार गेले आहेत. अनेकांना घर चालवणेही कठीण झाले आहे. अशातच शाळांनी शुल्क भरण्याचे फर्मान काढल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून शैक्षणिक शुल्क माफ करण्याचे आवाहन शैक्षणिक संस्थांना केले गेले आहे.

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरणे जिकरीचे झाले आहे. शैक्षणिक संस्था मात्र कोणत्याही प्रकारची तडजोड करायला तयार नाहीत. सर्वोच्च न्यालायने निर्देश देऊनही शिक्षण संस्था आपल्या शुल्का मध्ये एक रुपयाही कमी करण्यास तयार नाही. ज्या सुविधा गेल्या वर्षभर वापरल्या नाहीत त्या सुविधांचे पण शुल्क मागील वर्षी शिक्षण संस्थांनी वसूल केले. संकटाच्या काळामध्ये शिक्षणासारख्या पवित्र व्यवसायामध्ये सुद्धा संस्था आपण नफा सोडायला तयार नाहीत. सद्य परिस्थीती आपण जाणता, आज विद्यार्थ्याकडे आणि त्यांच्या पालकांकडे शुल्क भरण्याची आर्थिक क्षमताच नाही. आपण जर शुल्क कमी केले नाही आणि त्याच्याकडे शुल्कासाठी तगादा लावला तर त्याला शिक्षण अर्धवट सोडण्याशिवाय पर्यायच राहणार नाही. जर विद्यार्थीच शुल्काअभावी शिक्षण संस्थेत येवू शकला नाही तर संस्था तरी कश्या टिकतील. विद्यार्थी शिकलाच नाही तर या राष्ट्राचे भवितव्य काय असेल? असा प्रश्न राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने उपस्थित केला आहे.

आपल्याला देखील संस्था चालवण्यासाठी खर्च आहे हे आम्ही जाणतो. मात्र या परिस्थीती मध्ये काही गोष्टींचे आपल्या स्तरावर आपण नियोजन करू शकता, हे आपल्याला मान्यच करावे लागेल. समाजाच्या आणि राष्ट्राच्या भवितव्यासाठी अश्या परिस्थितीत सर्वांनीच पुढे येणे गरजेचे आहे. आपण आपले एक पाऊल विद्यार्थ्यांसाठी पुढे करावे. अशी विनंती करण्यात आली आहे.

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशाचा मान ठेवत आपण आपल्या शिक्षण शुल्कात सरसकट कपात करावी. त्याचबरोबर विदयार्थी ज्या सुविधा वापरत नाहीत त्याचे शुल्क आकारू नये. ज्या विद्यार्थ्यांचे मागील वर्षाचे शुल्क राहिले असेल त्या विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत परीक्षेपासून अथवा शिक्षणापासून वंचित ठेवू नये. तसेच त्याला शाळा- महाविद्यालय सोडण्यास भाग पाडू नये.

नर्सरी ते १०वी चे शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्थानी शैक्षणिक साहित्य (पुस्तके, वह्या इ.) शाळेतूनच घ्यावे लागतील ही सक्ती करु नये. तसेच बोर्डाने जी पुस्तके निर्देशित केली आहेत तीच पुस्तके शिकवताना वापरावीत. दुसऱ्या कोणत्याही प्रकाशनाची महाग पुस्तके पालकांना घेण्यास भाग पाडू नये, या मागण्या केल्या गेल्या असून, आपण सकारात्मक विचार करावा अन्यथा विद्यार्थ्यांच्या हितासाठी नाईलाजास्तव आपल्या विरोधात लोकशाही मार्गाने उग्र आंदोलन करावे लागेल, असा इशाराही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने शैक्षणिक संस्थांना दिला आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button