सांगली : थर्टी फर्स्टवर वन विभागाचा वॉच

थर्टी फर्स्टवर वन विभागाचा वॉच

सांगली : थर्टी फर्स्टला सरत्या वर्षाला निरोप आणि उगवत्या वर्षाचे स्वागत म्हणून मस्त पार्टी करण्याच्या बेतात असाल, आणि त्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात जाऊन मांडलेल्या चुलीवर फक्कड जेवणाचा प्लॅन आखत असाल तर सावधान…! चुकूनही अशा फंदात पडू नका. त्यामुळे कदाचित आपल्याला नववर्षाच्या सुरुवातीलाच कायद्याची हवा चाखावी लागू शकते. कारण संबंधित वनविभागासह पोलिस, पर्यावरण रक्षक व ग्रामस्थ यांच्या मदतीने तयार गस्त पथके वने व वन्यजीव परिक्षेत्रासह निसर्ग पर्यटन स्थळांच्या परिसरात ३० डिसेंबर ते १ जानेवारी या काळात जंगल क्षेत्रातील देखरेख मोहीम तीव्र करणार आहेत.

वन क्षेत्रात संचारबंदी जारी करण्यात आली आहे. जेवणावळी व नशापान करणाऱ्या उपद्रवी घटकांवर वन्यजीव कायदा व पोलिस अधिनियमांनुसार वेगवेगळे गुन्हे दाखल केले जाणार आहेत. दारू, तत्सम शितपेयाच्या बाटल्या, पत्रावळी, प्लास्टीक व इतर कचरा करणाऱ्यांवर जागेवरच कायदेशीर कारवाई होणार असल्याने याची वेळीच दक्षता घ्यावी लागणार आहे.

पोलिस ठाण्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पोलिस कर्मचारी, निर्भया पथक, विशेष कृती दल व जादा पोलिस पथके ठिकठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत. फिरत्या गस्त पथकाची पर्यटनस्थळी होणाऱ्या हुल्लडबाजीवर करडी नजर असणार आहे. नववर्षाचे स्वागत करताना वन आणि वन्यजीवांना उपद्रव होऊ नये यासाठी फिरती गस्ती पथके व स्थानिक वनसमितीच्या माध्यमातून बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. हुल्लडबाजी व कायदेभंग करणाऱ्यांना कठोर शिक्षा होईल असे गुन्हे दाखल करून न्यायालयापुढे हजर केले जाईल. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER