हनुवटीवर मास्क लावणाऱ्यावर सक्तीने कायद्याचा बडगा उगारा

aurangabad bench high court - Maharashtra Today
aurangabad bench high court - Maharashtra Today
  • औरंगाबाद खंडपीठाने दिले अनेक निर्देश

औरंगाबाद :- मराठवाड्याच्या ११ जिल्ह्यांमध्ये, नाकातोंडावरचा मास्क खाली हनुवटीवर सरकवून सार्वजनिक ठिकाणी फिरताना जे कोणी आढळतील त्यांच्यावर लगेच कायद्याचा बडगा उगारला जावा, असे निर्देश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पोलिसांना दिले आहेत. न्या. रवींद्र घुगे व न्या. भालचंद्र देबडवार यांच्या खंडपीठाने म्हटले की, नियम न पाळता ‘लॉकडाऊन’चे उल्लंघन करणारे कोरोना विषाणूच्या फैलावाचे सर्वांत  मोठे कारण (Super Spreader) असल्याने त्यांची जराही गय केली जाऊ नये. न्यायालयाने पुढे असेही म्हटले की, असे उल्लंघन करणार्‍यांना वाहतूक पोलिसांनी पकडल्यावर त्यांना सोडविण्याची उठाठेव मंत्री अथवा  लोकप्रतिनिधींनी करू नये. जर त्यांनी असे केले तर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा त्यांच्यावरही नोंदविला जावा.

मुंबई आणि नागपूरपाठोपाठ औरंगाबाद खंडपीठाने आपल्या अधिकार क्षेत्रातील कोरोना स्थितीचा विषय स्वत:हून जनहित याचिका म्हणून हाती घेतला आहे. वृत्तपत्रांमधील बातम्यांची दखल घेऊन न्यायालयाने हे पाऊल उचलले आहे. त्यात खंडपीठाने प्रतिवादींना सोमवारी औपचारिक नोटीस काढली व याचिकेत उपस्थित केलेल्या विषयांवर उत्तर देण्यास सांगून पुढील सुनावणी ३ मे रोजी ठेवली. यावेळी झालेल्या सुनावणीत न्यायमूर्तींनी अनेक तोंडी निर्देश दिले. न्या. घुगे म्हणाले की, मी स्वत: सकाळी जॉगिंगला जातो तेव्हा तोंडाला मास्क  लावून जातो. पण तरुण मुले मास्क न लावता व हेल्मेट न घालता एका मोटारसायकलवरून तिघे-चौघे फिरताना दिसतात.

लोकांनी स्वत:हून संयम आणि शिस्त पाळण्याची गरज आहे. न्यायमूर्ती म्हणाले की, मास्क न लावता मोटारींतून फिरणार्‍या व मास्क आणि हेल्मेटविना मोटारसायकलने फिरणाऱ्यांवर पोलिसांनी जागच्या जागी कडक कारवाई करायला हवी. तसेच सोमवार ते शुक्रवार सकाळी ११ नंतर जे रस्त्यावर फिरताना दिसतील त्यांना घराबाहेर पडण्याचे समर्थनीय कारण सिद्ध करण्यासाठी सोबत आधार कार्ड ठेवणे सक्तीचे करावे. डॉक्टर आणि ड्युटीवर नसलेल्या सरकारी कर्मचार्‍यांनाही यातून सवलत देऊ नये.

न्यायालयाने नोंदविलेली आणखी काही निरीक्षणे अशी :

  • खासगी इस्पितळांना स्वत:ला लागणाऱ्या ऑक्सिजनचे उत्पादन करण्यास जरूर प्रोत्साहन द्यावे. परंतु नाशिक आणि विरार येथील घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सुरक्षा उपाय पाळण्याकडे लक्ष द्यावे.
  • ग्रामीण भागांतील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही ‘आरटी पीसीआर’ अ‍ॅन्टिजेन चाचण्या करण्यासाठी किट्स उपलब्ध करावीत.
  • ‘टॉसिलीझुमाब’ व ‘इतोलिझुमाब’ ही इंजेक्शने ‘रेमडेसिवीर’ इतकीच तर ‘व्हिराफिन’ हे इंजेक्शन
  •  ‘रेमडेसिवीर’हूनही अधिक परिणामकारक आहेत याविषयी लोकांमध्ये जागृती करावी. जेणेकरून ‘रेमडेसिवीर’चाच आग्रह धरून त्याची टंचाई भासणार नाही.
  • ‘रेमडेसिवीर’चा काळाजाबार करणार्‍यांवर कडक कारवाई करावी.

ही बातमी पण वाचा : देशावर संकट आलेले असताना आम्ही मूक दर्शक राहू शकत नाही

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button