यासाठी ‘ठाकरे’ सरकारकडून काँग्रेसला दारुबंदीचं गिफ्ट, मुनगंटीवार यांचा घणाघात

Sudhir Mungantiwar & Uddhav Thackeray

चंद्रपूर : राज्य सरकारने ६ वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात लागू असलेली दारुबंदी उठवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यावरून भाजप (BJP) नेते सुधीर मुनगंटीवर (Sudhir Mungantiwar) यांनी या निर्णयावर सडकून टीका केली. ‘ठाकरे सरकारने (Thackeray Government) पदोन्नतीमधील आरक्षणावर सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा इशारा देणाऱ्या काँग्रेसला (Congress) दारुबंदी हटवून मोठं गिफ्ट दिलं आहे. आरक्षणाचा विषय सोडून देऊन दारुबंदी हटवल्यानं आनंदी व्हा असे काँग्रेसला अप्रत्यक्षपणे सांगण्यात आले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

दारुबंदी उठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्याची दारुबंदी उठण्याचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. सरकारने हा निर्णय घेताना काय तर्क लावला याची माहिती नाही. जर अवैध दारु विकली जाते म्हणून दारुबंदी हटवली असेल तर तो प्रकार वर्धामध्येही होतो. तेथे महात्मा गांधींचा आश्रम आहे ती त्यांची कर्मभूमी आहे म्हणून तिथे तसा निर्णय नाही का? सरकारचा हा तर्क मला पटलेला नाही. दारूची अवैध विक्री होते म्हणून बंदी हटवायची असेल तर मग गुटखा, पानपराग, जाफरानीवर बंदी का घालण्यात आली आहे? कोणत्याही पानपट्टीवर गेलात तर तुम्हाला हमखास मिळतं. यातून राज्याचं सरासरी १००० कोटी रुपयांचं महसूल बुडतं. मग पानपट्टीवाल्यांना अटक का करतो? प्लास्टिक बंदीने ७५० कोटी रुपयांचं नुकसान होतं. तसेच हजारो लोक बेरोजगार झाले. पण पर्यावरणासाठी आपण प्लास्टिक बंदी केली. असं असलं तरी अवैधपणे प्लास्टिक विकलं जातं. मग प्लास्टिकवरील बंदी हटवणार आहेत का? असा प्रश्न मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, वास्तविक पाहता काँग्रेसचं सरकार असताना एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीला ५८८ ग्रामपंचायतींनी दारुबंदीचे ठराव दिले. ५ हजारांपेक्षा जास्त महिला पायी क्रांतीभूमी चिमुरहून नागपूरला गेल्या. आर. आर. पाटलांनी त्या महिलांना आश्वासन दिलं. त्यानंतर ही समिती तयार करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते विकास आमटे, डॉ. अभय बंग हे त्या समितीचे सदस्य होते. त्या समितीने आरोग्यावरील दुष्परिणाम लक्षात घेऊन दारुबंदी केली. या जिल्ह्यात लोकांचे दारुमध्ये हजारो कोटी रुपये खर्च व्हायचे. ज्या पैशांचा लहान मुलांना खाऊ मिळावा ते पैसे कुटुंब उद्ध्वस्त करुन काही लोकांच्या पोटात जात होता. अवैधपणे विक्री होते म्हणून बंदी हटवणार असाल तर गांजावरील बंदी हटवणार आहेत का? ड्रग्ज पार्टी अवैधपणे होतात, रेव्ह पार्टी होतात हे सुरु करणार का? या सरकारचं दारुवर खूप प्रेम आहे. कोरोनाच्या काळात सरकारने इतर निर्णय घेतलेले नाहीत, पण दारुवर यांनी घाईघाईने निर्णय घेतला, अशी घणाघाती टीकाही मुनगंटीवार यांनी केली.

एकीकडे पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत काँग्रेसच्या काही नेत्यांनी सरकारचा पाठिंबा काढण्याचा इशारा दिला होता. अशावेळी काँग्रेसला दारुबंदी हटवून गिफ्ट देण्यात आलं. पदोन्नतीत आरक्षण देत नाही, पण तुमच्या मागणीनुसार दारुबंदी हटवतो. आता तुम्ही आनंदी राहा असं सांगण्याचा हा अप्रत्यक्ष प्रयत्न आहे. आता पुढची भूमिका जनताच ठरवणार आहे. आधी देखील दारुबंदी जनतेच्या भूमिकेतून झाली.५८८ ग्रामपंचायतींनी ठराव केले होते. महिलांचे मोर्चे निघाले. भविष्यात लोक जसे पुढे येतील आणि दारुबंदीची मागणी करतील तेव्हा आम्ही लोकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू, असा इशाराही मुनगंटीवार यांनी यावेळी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button