…यासाठी मराठी वाघाने दिला होता रॉयल बंगाली वाघाला पाठिंबा

Pranab Mukhrajee-Balasaheb Thackeray

मुंबई : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee) यांचे आर्मी रीसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये काल निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मुखर्जी यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा पाठिंबा मिळवण्यासाठी मातोश्रीवर भेट दिली होती.

त्या वेळी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या पाठिंब्याचे गुपित सांगताना म्हणाले होते की, मराठी वाघाने बंगाल रॉयल वाघाला (Royal Bengal tiger)पाठिंबा देणे हे नैसर्गिक आहे, ही आठवण मुखर्जी यांनी स्वतःच सांगितली होती. मात्र यासाठी त्यांना कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या नाराजीचाही सामना करावा लागला होता. प्रवण मुखर्जी यांनी यूपीएकडून २०१२ मध्ये राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढवली होती. त्याच वेळी भाजपप्रणीत एनडीएने पी. ए. संगमा यांना पाठिंबा दिला होता.

शिवसेना तेव्हा एनडीएतील घटक पक्ष असल्याने त्यांनी संगमा यांना पाठिंबा द्यावा, अशी भाजपची अपेक्षा होती; मात्र त्यापूर्वी झालेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने कॉंग्रेसच्या प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला होता. तेव्हा शिवसेनेकडून मराठी माणूस असा मुद्दा पुढे केला होता. प्रणव मुखर्जी यांनी शिवसेनेने (Shivsena) पाठिंबा द्यावा म्हणून मातोश्रीवर येऊन बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती.

या भेटीचे वर्णन त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात केले आहे. ते म्हणतात, ठाकरे यांना मी सांप्रदायिक राजकारणी म्हणून ओळखत होतो; मात्र त्यांनी मला त्यांचा मार्ग बदलून पाठिंबा दिला होता. हे विसरता येणार नाही. इतर कॉंग्रेस नेत्यांपेक्षा आपण वेगळे आहात, असे ठाकरे तेव्हा मला म्हणाले होते, अशी आठवण प्रणव मुखर्जी यांनी आत्मचरित्रात नमूद केली आहे.

ही बातमी पण वाचा : प्रणव मुखर्जी राष्ट्रपती झाले पण पंतप्रधानपद हुकले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER