
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही जण विचारत आहेत राज्य सरकारने पॅकेज का घोषित केलं नाही. आज गोरगरिबांना अन्न मिळणं, उपचार मिळणं हे महत्त्वाचं आहे. आपण गरिबांना उपचारासाठी मदत केली. शिवभोजन योजनेअंतर्गत पाच रुपयात भोजन दिलं. ७ ते ८ लाख मजुरांना घरी पाठवलं, यासाठी कुठल्या पॅकेजची घोषणा केली नाही. कुठलं पॅकेज द्यायचं? असा सवाल करत पोकळ घोषणा करणारं महाविकास आघाडीचं सरकार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्यभरात गोरगरीब, मजुरांसह लाखो लोकांना मदत केली आहे. त्याची जाहिरात करायची का? आम्हाला जाहिरात करण्याची गरज नाही. कारण येथून जाणारे परप्रांतीय मजूर आपल्या राज्यात जाऊन ‘महाराष्ट्र सरकार जिंदाबाद’च्या घोषणा देत आहेत, असा टोलादेखील त्यांनी लगावला. आम्ही रोज ८० ट्रेनची मागणी केंद्राकडे केली आहे. मजुरांना घरी पाठवण्याची व्यवस्था करत आहोत. त्यांचा खर्च आम्ही करत आहोत, असं त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. यावेळी सुरुवातीला त्यांनी सर्वांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “विरोधक ‘पॅकेज का नाही दिलं?’ असा प्रश्न विचारतात. केंद्र सरकारने लाखो कोटींची पॅकेज वाटली. पण हाती काय आलं?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. “आरोग्य सुविधा निर्माण करणे, अन्नधान्य आणि उपचार हे पॅकेजपेक्षा महत्त्वाचं आहे. सर्व वर्गासाठी मदत केली पाहिजे.” असं मुख्यमंत्री म्हणाले.
जो अंदाज वर्तवण्यात आला त्यापेक्षा खूपच कमी रुग्ण महाराष्ट्रात आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. मार्च-एप्रिलपासून कोरोना संकट सुरू झालं. आता अचानक या रुग्णांची संख्या वाढली. मी आपल्याला याबाबत अगोदरच कल्पना दिलेली आहे. हा विषाणू गुणाकार करत जातो. या गुणाकाराला मर्यादा नाही. मे महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रात सव्वा ते दीड लाख कोरोना रुग्ण असतील, असा इशारा दिल्लीने दिला होता, आज ३३ हजार ७८६ अॅक्टिव्ह रुग्ण, तर ४७ हजार हा एकूण रुग्णसंख्येचा आकडा आहे. आतापर्यंत जवळपास १३ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला