गृह खात्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत बिनसण्याची शक्यता

Uddhav Thackeray And Sharad Pawar

मुंबई : राज्यात नव्यानेच स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारचा खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार अद्यापही रखडलेला आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत राज्यात सत्तास्थापनेचा नवीन प्रयोग साकारला. मात्र या आघाडीत मंत्रिपदावरून अद्याप एकमत झाले नाही. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार केवळ फुटीच्या भीतीने रखडला का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीत गृह खात्यावरून एकमत होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून दोघांमध्ये कलह निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे.

येत्या मे-जूनमध्ये महाविकास आघाडीचं सरकार कोसळणार; भाजप नेत्याचा दावा

निवडणुकीपूर्वी आम्हाला जनतेने विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते म्हणत होते. त्या दृष्टीने या नेत्यांनी तयारीही केली होती. मात्र ऐनवेळी राज्यातील सत्तेची समीकरणे बदलली. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांना सत्तेत जाण्याची संधी मिळाली. आता काँग्रेस-राष्ट्रवादीमधील सर्वच नेत्यांकडून मंत्रिपदासाठी जोर लावण्यात येत आहे. यात कोणाला मंत्रिपद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेच्या वाट्याला मुख्यमंत्रिपदासह १५ मंत्रिपदे गेली असून राष्ट्रवादीच्या वाट्याला १६ आणि काँग्रेसला १२ मंत्रिपदे मिळणार आहेत. शिवसेनेत मंत्रिपदासाठी जाहीर नाराजी व्यक्त करण्याची संस्कृती नाही. त्यामुळे पक्षप्रमुख सांगतील तोच आदेश समजून नेते काम करतात. मात्र काँग्रेसमध्ये मंत्रिपदासाठी नाराजी नाट्य रंगण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये हे पाहायला मिळाले होते. राज्यातही असे होण्याची शक्यता आहे. किंबहुना मंत्रिपद न मिळाल्यास, काँग्रेस पक्षात फुटीची शक्यताही होऊ शकते.