मुख्यमंत्री पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या कार्यपद्धतीवर नाराज; थेट पवारांकडे नाराजी व्यक्त

Sharad Pawar-CM Uddhav Thackeray.jpg

मुंबई :- शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या रूपानं सत्ता मिळवली. महाविकास आघाडी सरकारला आता दीड वर्षांचा कार्यकाळ होत आहे. या दीड वर्षांच्या  काळात महाविकास आघाडीत छोट्या-मोठ्या कुरबुऱ्या होत होत्या. मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पहिल्यांदाच ठिणगी पडल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आतापर्यंत केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नाराज असल्याचे दिसून आले होते. मात्र आता पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रवादीच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची माहिती पुढे आली आहे.

जलसंपदा विभागाच्या सचिवांच्या नियुक्तीवरून मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यात खडाजंगी झाल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. जलसंपदा विभागाच्या कामात घाईगडबडीत निर्णय घ्यायला बाध्य करू नका, असं मत मुख्यमंत्र्यांनी पवारांकडे व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनंही मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीप्रमाणे प्रशासनाला हाताशी धरून राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य करू पाहात असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. राष्ट्रवादीची ही नाराजी मुख्यमंत्र्यांपर्यंतही पोहचवली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sataram Kunte) यांना पदावरून हटवून, त्यांच्या जागी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी असल्याचं सांगितलं जात आहे. सरकार अंतर्गत सुरू  असलेल्या या घडामोडींमुळे मुख्यमंत्री प्रचंड अस्वस्थ असल्याचं सांगितलं जात आहे.

मुख्यमंत्र्यांची ही अस्वस्थता शरद पवार यांच्यापर्यंत पोहचवली गेली आहे. फडणवीस सरकारच्या आधी आघाडी सरकारमध्ये जलसंपदा विभागातील भ्रष्टाचारावरून सरकारला पायउतार होण्याची वेळ आली होती. त्यामुळे माझ्या सरकारच्या काळात किंवा माझ्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात असा कुठलाही डाग लागू नये, याची खबरदारी मुख्यमंत्री घेत असल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, याबाबत मंत्रिमंडळाची चर्चा बाहेर सांगू नये अशी प्रथा आहे. मी याबाबत काही भाष्य करणार नाही. मला जे काही बोलायचं आहे ते आवश्यकता असेल तर मी मुख्यमंत्र्यांशी बोलेन. कामकाज करत असताना नाराजी धरायची नसते. त्या त्या वेळी तो तो विषय असतो. त्यामुळे कामाबाबत नाराजीची गरज नाही, असं मत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button