राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी पहिल्यांदाच व्यक्त केली खंत, म्हणाले…

Maharashtra Today

भंडारा : कोरोनाच्या(Corona) रूग्णसंख्येत होणारी वाढ सध्या नियंत्रणात येत आहे. मृत्यूंची संख्याही कमी होताना दिसत आहे. मात्र मागील काही दिवसांपूर्वीची परिस्थिती अत्यंत भयंकर होती. जिकडे तिकडे बेड्स, रेमडेसिव्हिर आणि इतर औषधांची कमतरता होती. अशा स्थितीत १५ दिवसांपूर्वी खासदार प्रफुल्ल पटेल( Praful Patel ) यांनी दिल्ली येथे एका जवळच्या व्यक्तीला बेड मिळवून देण्यासाठी फोन केला होता. पण त्याचा काहीही उपोयोग झाला नाही. बेड्स रिकामे नसल्याने परिचित व्यक्तीला बेड मिळू शकला नाही. ‘मी फोन लावूनसुद्धा एका परिचिताला बेड उपलब्ध करून देऊ शकलो नाही.’ अशी खंत खासदार पटेल यांनी पहिल्यांदाच व्यक्त केली.

माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना खासदार पटेल म्हणाले, त्यावेळी औषधींचाही मोठा तुटवडा निर्माण झाला होता. कॉसली झूमा हे इंजेक्शन हवे होते, ते मी चेन्नईवरून मागवून दिले होते. कोरोनामुळे किती भयंकर स्थिती निर्माण झाली होती, याचे वास्तव त्यावेळी मला दिसून आले. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत जर बेड व औषधांचा तुटवडा झाल्याची परिस्थिती असेल तर इतर राज्य व शहरांच्या विचार न केलेला बरा, असा प्रश्न मला पडला. नशिबाने कॉसली झूमा हे इंजेक्शन गोंदियाच्या सरकारी आणि खासगी दवाखान्यात उपलब्ध आहे, असेही ते म्हणाले.

कोरोनाची दुसरी लाट अचानक सर्वत्र आली. एकट्या गोंदियातच आली असे नाही. तर देशभर कोरोनाने हाहाकार माजवला होता. गेले १५-२० दिवस आपल्या राज्यासाठी आणि देशासाठी अतिशय भयावह गेले. पण आता स्थिती नियंत्रणात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी चिंता करण्याचे काही कारण नाही. सरकारने घालून दिलेले निर्बंध पाळा. गर्दी करू नका, मास्कचा वापर करा. असे केल्याने पाहता पाहता आपण कोरोनाला हद्दपार करू शकू, असे खासदार पटेल म्हणाले.

अशा परिस्थितीत सर्वानी संयम राखण्याची गरज आहे. प्रशासन आपल्यासाठी दिवसरात्र काम करत आहे. आपणही प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. अशा काळात अफवांचेही पेव फुटते. पण नागरिकांनी अधिकृत माहितीवर विश्‍वास ठेवावा. आपल्या जवळपासच्या लोकांमध्ये जागृती निर्माण करावी. कोरोनाचे लक्षण जाणवताच तात्काळ चाचणी करून घ्यावी. जेणेकरून वेळेवर उपचार मिळतील आणि जीवाला धोका निर्माण होणार नाही. प्रशासन नागरिकांचे आरोग्य राखण्यासाठी सज्ज आहे, असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button