बुध्दिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताला प्रथमच सुवर्ण

Chess

कोरोनाच्या (corona) काळात क्रीडा क्षेत्रातून भारतासाठी एक चांगली बातमी आली आहे. बुध्दिबळ आॕलिम्पियाड (Chess Olympiad) स्पर्धेत भारताला प्रथमच सुवर्ण यश मिळाले आहे. आॕनलाईन खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत भारताला (India) रशियासह (Russia) संयुक्त विजेते घोषित करण्यात आले आहे. अंतिम फेरीच्या निकालाबाबत काहीशी गोंधळाची स्थिती असताना बुध्दिबळ नियंत्रण संस्था ‘फिडे’ ने हा निकाल दिला आहे. भारतीय संघ प्रथमच अंतिम फेरीत पोहोचला होता. याआधीे 2014 मधीेल कास्यपदक हीे भारताची आॕलिम्पियाडमधील सर्वोत्तम कामगिरी होती.

त्याआधी अंतिम फेरीेची लढत भारताने गमावल्याचे जाहीर करण्यात आले होते परंतु भारतीय चमूने त्याविरोधात दाद मागितल्याने भारताला हे ऐतिहासिक यश मिळाले आहे. आॕनलाईन खेळताना सर्व्हरच्या तांत्रिक समस्येमुळे इंटरनेट ठप्प झाल्याने आपल्या खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम झाल्याचा दावा भारताने केला होता.

सुवर्णपदकाच्या लढतीत भारतीय बुध्दिबळपटूंनी रशियाला तोडीस तोड मुकाबला केला. मात्र निहाल सरीन व दिव्या देशमुख हे दोघे हरल्याचे जाहीर करण्यात आले मात्र त्यांचे इंटरनेट कनेक्शन हरवले होते. कोनेरू हम्पीलाही तांत्रिक अडचणी आल्या.

ही तांत्रिक समस्या आली त्यावेळी पटावर दिव्या विजयाच्या स्थितीेत होती म्हणून भारतीय चमूने या निकालांविरोधात दाद मागितली. त्यानंतर तासाभराने ‘फिडे’चे अध्यक्ष अरकादी वोरकोवीच यांनी भारत व रशिया या दोघांनाही संयुक्त विजेते जाहीर केले.

त्याआधी अंतिम लढतीची पहिली फेरी 3-3 बरोबरीत सुटली. दुसऱ्या फेरीतही बरोबरी होती आणि ही तांत्रिक समस्या उद्भवण्याआधी टाय ब्रेकरचा वापर करावा लागेल अशी स्थिती होती.

याआधी उपांत्यपूर्व फेरीतही भारताच्या अर्मेनियावरील विजयातही अशीे सर्व्हरची समस्या आली होती. त्यावेळी अर्मेनियन खेळाडूंनी केलेले अपील फेटाळले गेले होते. त्यानंतर पोलंडला नमवत भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला होता.

भारताच्या सुवर्ण विजेत्या संघात कर्णधार विदीत गुजराथीसह ग्रँडमास्टरच विश्वनाथन आनंद , कोनेरू हम्पी, आर प्रज्ञानंद, हरिका द्रोणावल्ली, दिव्या देशमुख, निहाल सरीन, पी. हरिकृष्ण यांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER