
नवी दिल्ली :- वृत्तसंस्था जानेवारी महिन्यामध्ये देशभरात मान्सूनसदृश स्थिती अनुभवास येत आहे. उत्तरेकडील राज्यांत होणारी तुफान बर्फवृष्टी तसेच दक्षिणेकडील राज्यांत पडणारा मुसळधार पाऊस असे वातावरण आहे. दक्षिणेत चालू महिन्यात पडलेल्या पावसाने गेल्या शंभर वर्षांपूर्वीचा उच्चांक मोडला असून, दुसरीकडे उत्तरेसह इतर पर्वतीय भागाने 5 ते 8 फूट जाड बर्फाची चादर पांघरली आहे.
गेल्या दोन दशकांनंतर प्रथमच वातावरणात इतका लहरीपणा पाहायला मिळत असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. पश्चिमी विक्षोपीय वाऱ्यांसह इतर ठिकाणी चक्रवात स्थिती निर्माण झाल्यामुळे वातावरणात हे बदल दिसून येत आहेत. पाऊस, बर्फवृष्टी बंद झाल्यानंतर थंड वाऱ्याचा परिणाम उत्तर, पश्चिम, मध्य तसेच पूर्वेकडे असलेल्या पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये जाणवेल. यामुळे या राज्यांतील तापमानात कमालीची घसरण होईल. त्यात 14 जानेवारी हा सर्वात थंड दिवस ठरेल, असा अंदाज आहे. दिल्लीत यंदा 2 ते 7 जानेवारीदरम्यान 57 मि.मी. पाऊस झाला. येथे सामान्यपणे जानेवारी ते मार्चदरम्यान मिळून इतका पाऊस पडतो. चंदीगड आणि लडाख वगळता उत्तर-पश्चिमेकडील सर्व राज्यांत दोन ते तीन टक्के अधिक पाऊस झाला. महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ तसेच मध्य प्रदेशातील बहुतांश जिल्ह्यांत 11 जानेवारीपर्यंत चांगला पाऊस कोसळला आहे.
पश्चिमी विक्षोपीय वाऱ्यांमुळे राजस्थानात थंडीत वाढ झाली आहे. अगदी दिवसाही लोकांना हुडहुडी भरत आहे. काही शहरांत रात्र आणि दिवसाचे तापमान समान नोंदविले जात आहे. मध्य प्रदेशातील बहुतांश जिल्ह्यांत अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असून, त्यामुळे भोपाळ शहरात दिवसाचे तापमान घसरले आहे. तिथेच रात्रीच्या तापमानाने नऊ वर्षाआधीचा उच्चांक मोडला आहे. पंजाब राज्यात 13 जानेवारीपर्यंत थंडी कायम राहणार असून, रात्रीच्या तापमानात कमालीची घसरण होण्याचा अंदाज आहे. येत्या तीन दिवसांत थंड वाऱ्याने गारठ्यात वाढ होण्याबरोबर वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला