फ्लॅटचे पैसे वेळेत न देणार्‍या ग्राहकास प्रथमच झाला दंड

बिल्डरच्या तक्रारीवर ‘महारेरा’चा निर्णय

Rera

मुंबई : फ्लॅटचे बुकिंग करताना बिल्डरशी केलेल्या करारानुसार वेळेवर पैसे न भरणार्‍या ग्राहकाने थकीत रक्कम बिल्डरला वाढीव व्याजासह महिनाभरात चुकती करावी, असा आदेश महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाने (MAHARERA) अलीकडेच दिला. फ्लॅटचे पैसे भरूनही त्याचा ताबा देण्यास विलंब करणाऱ्या बिल्डरला दंडित करणारे निकाल याआधी बरेच झाले आहेत. परंतु तोच न्याय फ्लॅट ग्राहकासही लावणारा हा बहुधा पहिला निकाल आहे.

मे. एसएमपी नम्रता असोशिएट््स बिल्डरने सुवर्णा संतोष नाझरेकर या फ्लॅट ग्राहकाविरुद्ध केलेल्या तक्रारीवर प्राधिकरणाचे सदस्य डॉ. विजय सतबीर सिंग यांनी हा निकाल दिला. ‘महारेरा’ कायद्यानुसार बिल्डर ग्राहकाविरुद्ध अशी तक्रार दाखल करू शकत नाही आणि ग्राहकास थकीत वादग्रस्त रक्कम दंडात्मक व्याजासह चुकती करण्याचा आदेश दिला जाऊ शकत नाही, हा नाझरेकर यांचा मुद्दा त्यांनी साफ फेटाळून लावला.

रिअल इस्टेट नियामक कायद्यातील संबंधित तरतुदीवर बोट ठेवून डॉ. सिंग यांनी नमूद केले की, करारानुसार आपापली जबाबदारी पार पाडण्याचे बंधन बिल्डर व ग्राहक या दोघांवरही आहे. यापैकी कोणीही यात कुचराई केली तर त्याला दंडित करण्याचे अधिकार प्राधिकरणास आहेत.

हे बिल्डर पिंपरीमध्ये विकसित करत असलेल्या एका गृहसंकुलात नाझरेकर यांनी फ्लॅट बुक केला आहे. करारानुसर फ्लॅटची एकूण किंमत ५० लाख रुपये ठरली आहे व त्यापैकी सुरुवातीची फक्त एक लाख रुपयांची रक्कम त्यांनी खरेदी करताना भरली आहे. त्यासाठी त्यांनी बँकेकडून गृहकर्ज घेतले आहे. बिल्डरने करारानुसार राहिलेली रक्कम भरण्याची मागणी केली. पण नाझरेकर यांनी ती वेळेवर भरली नाही, म्हणून ही तक्रार दाखल केली गेली.

नाझरेकर यांचे म्हणणे असे की, राहिलेली रक्कम चुकती करण्यास आपली तयारी आहे. परंतु बिल्डरने जो दोन टक्के वाढीव ‘जीएसटी’ लावला आहे तो कमी करावा व थकीत रकमेवर दंडात्मक व्याज आकारले आहे तेही रद्द करावे. यावर बिल्डरचे म्हणणे असे होते की, वाढीव ‘जीएसटी’ व दंडात्मक व्याज खरेदी करारानुसारच लावले आहे. आपणसुद्धा या गृहप्रकल्पाच्या बांधणीसाठी कर्ज घेतले आहे व त्याचे हप्ते भरावे लागत आहेत. ग्राहकास कराराचे पालन करायचे नसेल तर त्यांच्याशी केलेली फ्लॅटविक्रीचा करार रद्द करून त्यांनी भरलेली रक्कम जप्त करण्याची आपल्याला मुभा द्यावी. या वादात ‘महारेरा’ने वरीलप्रमाणे बिल्डरच्या बाजूने निकाल दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER