‘जाणता’ घडण्यासाठी

MAnsi

हाय फ्रेंड्स ! ‘जाणता’ म्हणजेच जाणीव असलेला. प्रत्येक गोष्टीचे ज्ञान असलेला. मला ज्ञान म्हणजे फक्त ‘नॉलेज’ म्हणायचं नाहीच मुळी ! तर ‘सजग जाणतेपण’, जे खऱ्या अर्थाने आपली पंचेंद्रिये जागती ठेवली तर मिळतं आणि मनाची कवाडं उघडी ठेवली तर मिळतं. मग कुणी म्हणेल, हवंय कशाला हे ज्ञान ?

फ्रेंड्स! आयुष्य जगताना असा प्रसंग येऊ नये म्हणून की, जे कमवायला हवं होतं ते तर मी कमवलंच नाही असं वाटायला लागेल. काय नाही कमवावं लागत ? शरीर, मनोवृत्ती, संस्कार, सवयी, दृष्टिकोन नाती, प्रेरणा, प्रेम ,मैत्री, भावना आणि या सगळ्यांचा समतोल; शिवाय तदनुभूती, डोळसपणा, शौर्य, धैर्य, साहस, कणखरपणा नि  चिवटपणा ! ही तर केवळ झलक! हे सगळं पुस्तकातून मिळेल काहो ? हो ! बरंच काही पुस्तकातून मिळतं. “वाचाल तर वाचाल!” असं म्हणतात अगदी खरे आहे. पण कोणती पुस्तकं? बरेच वेळा कुठल्याही मुलांना विचारलं, काय वाचतोस ? तर एकूणच विद्यार्थ्यांना बरेचदा अभ्यासाच्या पुस्तकाचे वाचन एवढंच माहीत असतं. त्याला तर परीक्षेचा अभ्यास म्हणतात. बघा हं ! मी त्याला परीक्षेचा अभ्यास म्हटलंय. म्हणजे त्या वर्षीच्या अभ्यासक्रमातील केवळ एक पेपर सोडवण्यासाठी जे लागतं ते वाचन. एवढ्या मर्यादित अर्थाने ते वाचलं जातं.

परंतु वाचनातून माणूस घडतो हे नक्की! यावरही आपण खरं तर खूप बोलू शकतो. बरेचदा कुमारावस्था आणि तरुण वयातील किंवा युवावस्थेतील म्हणजेच जोपर्यंत अंगात सळसळते रक्त असते ना, तोपर्यंत मुळी आपल्याला बरेचदा मोठी माणसं सांगतात ते पटतच नाही. याचा अर्थ वडील मंडळींनी सतत गळक्या नळासारख्या सूचनाच कराव्या असं नाही म्हणणार मी ! परंतु ते म्हणतात त्याप्रमाणे खरंच, ‘चार पावसाळे जास्त’ त्यांनी पाहिलेले असतात. आणि कुठे तरी आपलं भलं व्हावं, अशी प्रेमाखातर त्यांची इच्छा असते. त्यातून आपल्याला बरंच काही मिळत असतं, पण खरं सांगू ? त्यावेळी आपला अहंकार, इगो आडवा येतो. आम्ही आता पुरेसे मोठे झालेलो आहोत आणि फालतू गोष्टी ऐकायच्या नाही आहेत- असं म्हणणं असतं ! मग ते लॉजिकली कसं बरोबर नाही, मग सायंटीफिकली त्यात कसं तथ्य नाही, कसले पुराणमतवादी विचार आहेत हे ! असं सगळं  prove करण्यातच सगळी शक्ती घालवली जाते. विषय थांबतो ! कुणी तरी उगीच वादविवाद नको म्हणून तो थांबवतो. आणि तरुण वयात असणाऱ्या आपल्याला आपण जिंकल्याचा कोण आनंद होत असतो; पण या सगळ्यांमध्ये ‘मूळ मुद्दा’ विसंवादाच्या जोराच्या प्रवाहांमध्ये दूर कुठे तरी वाहून गेलेला असतो.

१) फ्रेंड्स ! कदाचित एवढ्या सगळ्या वाक्युद्धपेक्षा ‘तो मूळ मुद्दा’ फक्त  ऐकला  असता तर ? ‘ऐकला’ म्हणजे नुसता कानावर पडून घेतला असता तर तेवढ्याचे फळ होते सिनिअर  व्यक्ती खूश झाली असती की, “चला बाबा माझं कुणी तरी ऐकलं !”

२) दुसरी गोष्ट तो ‘ऐकला’ म्हणजे कानातून मेंदूत येऊन त्यावर विचार केला असता तर, कदाचित त्यात काहीसं तथ्य आहे असं  आपल्याला वाटलं असतं. आणि जर ते योग्य आहे असं वाटलं तर त्यांचा आपण मेंदूत संग्रहही केला असता.
पुढचा पर्याय :

३) ठीक आहे ! फार काही तथ्य असेल असं वाटत नाही; पण may be एवढी वयस्क व्यक्ती सांगते आहे म्हणजे त्यात काही तरी असू शकेल ! तोपर्यंत ‘बॅक ऑफ द माइंड’ आपण तो विषय टाकू शकतो.

उदाहरणार्थ, श्रद्धा किंवा भक्ती, परमेश्वर किंवा उच्च शक्ती. कर्मकांड वगैरे. मी स्वतः देवाची भक्त होते; कारण घरातले संस्कार ! म्हणजे देव शब्दाशी परिचित होते. संध्याकाळी दिवे लावून शुभंकरोती म्हणायचे हे रुटीन होते. पण तरुण वयामध्ये यातील बऱ्याच गोष्टी मला पटत नव्हत्या. बऱ्याच वेळा किंबहुना असंही वाटत होतं की आपल्या कर्तृत्वावरच भाग्य अवलंबून असतं. देवाला उगीच कुठे कुठे बघायला लावायचं ? नंतर हळूहळू अनेक प्रसंग, अडचणींच्या काळात ,अनेक जीवनानुभव घेत असताना आज काहीतरी एक ‘उच्च शक्ती’ आहे की, जिच्यामुळे हे सगळे विश्व चालते यावर विश्वास बसला. उदाहरणार्थ आजारपणामध्ये डॉक्टरांचे उपाय थकतात तेव्हा बरेचदा मिरॅकल्स घडतात. त्यामुळे अशा घटनांमधून श्रद्धा निर्माण झाली. असंही असेल कदाचित कधीतरी एखाद्या परिस्थितीने माणूस हतबल होतो आणि त्यावेळी ही श्रद्धा आपल्याला धीर धरायला मदत करते. म्हणजे “असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी!” हे मला अजूनही मान्य नाही. परंतु आपले प्रयत्न पूर्ण करून उरलेले त्या शक्तीवर सोपवले तर आयुष्य सोपे होते हे कळत गेले. पण तुम्ही म्हणाल दररोज साग्रसंगीत पूजा, ती मला अजूनही जमत नाही. कर्मकांड मला मान्य नाही. परंतु हा फक्त मी, माझा, माझ्यापुरता अनुभव सांगितला.

प्रत्येकाचा या बाबतीत अनुभव, मत वेगळे असेलही; कारण प्रत्येक व्यक्ती युनिक आहे. परंतु विचार होणे महत्त्वाचे, असे मला वाटते. मी त्याचा जेव्हा विचार करते तेव्हा मला जाणवतं की ज्यावेळी मन सैरभैर होतं त्यावेळी हे कर्मकांड, नियमितपणे केलेली देवपूजा मदत करत असावी. म्हणूनच ती सध्या मी ‘बॅक ऑफ माइंड’ ठेवली आहे. पण माझी पंचेंद्रिये उघडी ठेवून मी त्याकडे बघणे सोडलेले नाही. आमच्या काकू पूजा करतात ते मी बघत असते. कुठे तरी त्या चंदनाचा सुगंध, उदबत्तीचा सुवास, विविध रंगांची फुले आणि त्यांची आरास, एकीकडे स्वत:च्या शुद्ध स्वरात म्हटलेली स्तोत्रे, त्यांची लय, शब्द , वर्णन आणि तेही स्वतःच्या शब्दात. हे सगळे मी जेव्हा बघते तेव्हा हा अरोमाथेरपी (सुगंध ) तसेच शब्द लयातील स्तोत्रे, म्हणजे (म्युझिक थेरपी) हे सगळं घडत असलं पाहिजे. आपल्या मेंदूला, आपला स्वतःचा स्वर नेहमी सगळ्यात जास्त प्रिय असतो असं शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालं आहे.

त्यामुळेच स्तोत्र ,अभंग ,भजन करणे लोकांना प्रिय होत असावे. असो, सांगायचा मथितार्थ असा की, विचार एकदम झिडकारले नाहीत. तर तपासत राहिले आणि जर ते योग्य वाटले तर ते हळूहळू मनात, हृदयात झिरपतात, तेही नकळत! अगदी नाही ठरवले तरीही. यालाच तर संस्कार म्हणतात. संस्कार करू म्हटल्याने होत नाही ते झिरपावे लागतात. त्याला वयोमर्यादा नसते. हे संस्कार चांगले होण्यासाठी ‘सत्संग’ म्हणजे चांगल्या लोकांच्या सहवासात राहायला  हवे, असे म्हटले जाते. आणि मुख्य म्हणजे मनाची कवाडं खुली, उघडी ठेवायला हवी. यात कुठेही पूर्वग्रह, समज-गैरसमज यांना स्थान न देता कोणत्याही विचारावर खुल्या मनाने विचार करून पाहिला पाहिजे. तरच जाणत्यांचे प्रसंग जाणून घेऊन त्यांना आलेल्या भावनांचे रंग आपण जाणून घेऊ शकू .यातूनही नको वाटले तर सोडून द्यायला आपला दुसरा कान असतोच की !

फ्रेंड्स ! वाचनातून माणूस कसा घडत जातो , जाणता होतो ते बघूया उद्याच्या लेखात. असा जाणता घडण्यासाठी समर्थ सांगतात, “जाणत्यांचे पेच जाणावे l जाणत्यांचे पीळ उकलावे l …. जाणत्यांचे जाणावें प्रसंग l जाणत्यांचे घ्यावे रंग l जाणा त्यांच्या स्फूर्तीचे तरंग अभ्यासावे ll

ही बातमी पण वाचा : सोशल मीडिया आणि ट्रोलयुग

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER