आमिर खान प्रथमच करणार एकाच वेळी दोन सिनेमांचे काम

बॉलिवूडमध्ये (Bollywood News) आमिर खान (Aamir Khan) हा असा एक कलाकार आहे जो एका वेळी एकाच सिनेमावर काम करीत असतो. सिनेमा साईन केल्यापासून ते तो सिनेमा रिलीज होईपर्यंत तो दुसऱ्या कोणत्याही प्रोजेक्टला सुरुवात करीत नाही. त्यामुळेच वर्षाला किंवा दोन वर्षाला त्याचा एक सिनेमा रिलीज होतो. त्याचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर कोट्यावधींच्या उड्या घेत असल्याने त्याने एका सिनेमासाठी एक-दीड वर्ष घेतले तरी ते फायदेशीर असते. तो कधीही घाईघाईत सिनेमे करीत नाही. परंतु 2021 हे वर्ष आमिरच्या कारकिर्दीतील एक वेगळे वर्ष ठरेल असे वाटत आहे. याचे कारण म्हणजे तो या एका वर्षात एका नव्हे तर चक्क तीन सिनेमावर काम करणार आहे.

आमिर खान सध्या त्याचे होम प्रॉडक्शन असलेल्या ‘लाल सिंह चड्ढा’चे शूटिंग नुकतेच पूर्ण केले असून सध्या तो पोस्ट प्रॉडक्शनच्या कामात व्यस्त आहे. या कामात डिस्टर्बन्स येऊ नये म्हणून त्याने काही काळ सोशल मीडियापासून दूर राहाण्याचाही निर्णय घेतला आहे. मात्र आमिरच्या अत्यंत जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आमिर खान लाल सिंह चड्ढा रिलीज झाल्याबरोबर नेहमीप्रमाणे आराम न करता लगेचच दुसऱ्या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. एवढेच नव्हे तर तो आता एकाच वेळी तीन सिनेमाचे काम करणार असल्याचेही सांगण्यात आले.

लालसिंह चड्ढानंतर आमिर खान लगेचच ‘मोगल’ सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार असल्याचे सांगितले जात आहे. मोगल हा प्रख्यात कॅसेट किंग गुलशन कुमार यांच्या जीवनावरील सिनेमा असून याची निर्मिती टी सीरीज करीत आहे. आमिर खान या सिनेमात गुलशन कुमार यांची भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वी आमिर खान हा सिनेमा करणार नसल्याचे म्हटले जात होते परंतु त्यात तथ्य नसल्याचे समोर आले आहे. जूननंतर हा सिनेमा फ्लोरवर जाणार आहे. यानंतर आमिर खान साऊथच्या विक्रम वेधाच्या हिंदी रिमेकचे काम सुरु करणार आहे. यासोबतच सध्या आमिर खान एका सुपरहिट ‘चॅम्पियन’ या स्पॅनिश सिनेमाच्या हिंदी रिमेकसाठीही चर्चा करीत आहे. 2018 मध्ये रिलीज झालेला स्पेनचा हा सिनेमा स्पोर्ट्स ड्रामा आहे. यात एका अशा बास्केटबॉल कोचची कथा मांडण्यात आलेली आहे जो दारुडा आणि गर्विष्ठ असतो. दिव्यांग मुलांच्या टीमचा तो कोच बनतो आणि त्यांना विजेता कसा बनवतो त्यावर ही कथा आधारित आहे. या सिनेमाची निर्मिती सोनी पिक्चर्स करणार असून दिग्दर्शन आर. एस. प्रसन्ना करणार आहे. प्रसन्नाने 2017 मध्ये आलेल्या ‘शुभ मंगल सावधान’चे दिग्दर्शन केलेले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER