सहज संवादी सहजीवनसाठी !

For easy communication

कुठेही अगदी रेल्वे स्टेशन ,बस स्टँड ,लग्नकार्य अशा गर्दीच्या ठिकाणी गेलं की माणसं वाचण्याचा माझा छंद आहे. त्यांच्या वागण्या बोलण्यावरुन, हालचालींवरून ,चेहऱ्यावरील हावभावांवरून, प्रतिक्रियांमधून काहीतरी वाचन सुरू असतं. अर्थात प्रत्येक वेळी बरोबरच असतं असंही नाही .पण बरेचदा तुटक उत्तरातून, एखाद्याच शब्दातून ,निश्वासातून ,उपहासाने हसण्यातून, चेहऱ्यावर दिसणाऱ्या ताणामधून त्यांच्या आपापसातल्या नात्यांचा अंदाज बरेचदा बांधता येतो आणि त्यांच्यातल्या सहजीवनाचाही अंदाज येत रहातो.

फ्रेंडस ! सहजीवन हा शब्द आपण एकाच नात्यासाठी वापरतो ,ते म्हणजे नवरा बायकोच्या नात्याबद्दल ! पण सहजीवन म्हणजे बरोबर जगणे ! आयुष्य एकत्र व्यतीत करणे म्हणजे सहजीवन मग ते कुठलेही असेल, आपण आपले आई-वडील भावंडे यांच्याबरोबर घालवलेले आयुष्य ते सह जीवनच होते, पूर्वी आपण जर एखाद्या वाड्यात चाळींमध्ये किंवा कॉलनीत राहत असू तरीही ते तेथील सहजीवन असते. तेथील बरेच आनंदानुभव आपण घेतले असतील .शाळा-कॉलेज हॉस्टेल्स मधले रूममेट, नोकरीच्या ठिकाणचे सहकारी ,वरिष्ठ ,कनिष्ठ एवढेच काय मी तर म्हणेन आपल्या घरची बाग आणि आपल्या घरचे पाळीव प्राणी यांच्या बरोबरचे ही सहजीवनच असते. वृद्धाश्रम अनाथालय या ठिकाणी राहणारे आबालवृद्ध सहजीवनच जगतात.

कोणत्याही व्यक्ती एकत्र राहत असताना जे बंध निर्माण होतात त्यातून फुलत ते सहजीवन ! अर्थात यात निर्माण होणारे बंध महत्त्वाचे असतात. प्रसिद्ध अभिनेते रमेश देव यांनी एका ठिकाणी सांगितला की त्यांना शेती करायची खूप हौस होती. गावी शेतीमध्ये ते खूप रमत. पण काळाच्या ओघात नशिबाने अभिनयाचे क्षेत्र वाट्याला आले .ते त्यांच्या शेतातली एक आठवण सांगतात की त्यांच्या शेतात एक पिवळीधम्म धामण होती. शेतातून सळसळत गेली की विजेचा लोळ वाटे. सगळी कामावरची माणसं घाबरायची. खरतर धामण बिन विषारी ! पण लोक घाबरत, म्हणून तिला बंदुकीने मारण्याचा प्रयत्न केला .पण तो नेम हुकला. त्यामुळे तर लोक आणखीनच घाबरले. येईनासे झाले. शेवटी बत्तीसशिराळयाच्या एका व्यक्तीला बोलावून ती पकडली व तो घेऊन गेला. पण धामण गेली तेव्हा उगीचच चूकचुकल्यासारखं वाटलं.

शेताची राखणदारच गेल्यासारखं वाटलं. असे ते म्हणतात. आणखीन एक आठवण म्हणजे त्यांच्याकडे एक बैल जोडी होती .त्यांच्यावर यांचे खूपच प्रेम. एक दिवस मोतेचा दोरा तुटून भार एकावरच पडल्याने एक बैल खाली बांधात पडला .त्याचा पाय मोडला डॉक्टर म्हणाले उपचाराचा उपयोग होणार नाही .बसल्याजागी खूप हाल होतील. तेव्हा कसायाला देऊन टाका .पण कसायला न देण्याचा निर्णय तर पक्का होता .मात्र मारून तिथेच पूरण्याचे ठरले. (तेही माझ्या माघारी ,मला सांगूही नका. असे त्यांनी सांगितले .इतका त्यांचा जीव) नंतर एकदा शेतात चक्कर मारताना एका जांभळाच्या झाडाला गोड टपोरी जांभळे होती. सोबतचा कामकरी म्हणाला ,आपल्या पवळ्यालाच हातचं पुरलय.

झालं पहिल्या जांभळाने तोंड कडू जार झालं. तेव्हापासून जांभूळ खायचं सोडून दिले. प्राणी ,शेती ,निसर्ग यांच्या बरोबरचे बंध हेही सहजीवनाचा भाग .पण मला वाटतं ते खूप छान टिकतात कारण त्यात निसर्ग आपल्याला खूप देतो पण आपल्याला काहीच मागत नाही ,अपेक्षा करत नाही. माणसानंसोबत सहजीवनात मात्र खूप जर… तर असतात.

जोडीदारासोबतचे पती-पत्नीमधील नातं हा सहजीवनाचा पायाच आहे खरं तर. पण अनेकांच्या आयुष्यातील सहजीवन खऱ्या अर्थाने फार लवकर संपून जातं. केवळ एकत्र सोबत, एकाच छपराखाली राहणं एवढंच उरतं. एकाला दुसरा कुणीतरी असावं एवढंच त्यात गृहीत असतं किंवा काहींनी मतभेद बाजूला ठेवून “आलिया भोगासी “असे म्हणून पांढरे निशाण फडकवले असते. तोडणे सोपे, जोडणे कठीण, आता केल्यानंतर कसं तोडणार?आणि एवढ्या एवढ्याशा कारणांनी लगेच तोडायचं कशाला जुळवून घ्यायलाच हवं, आणखीन गहन कारण म्हणजे लोक काय म्हणतील? बरेचदा कुठलाही गंभीर विषय इथे येऊन थांबतो.

पण मग कुठेही त्या नात्यात आत्मीयता ,ओढ ,आपुलकी ,प्रेम रहात नाही .हे केवळ सवय व सोय यासाठी एकत्र राहिल्यामुळे दूरावा, एकटेपणा, नैराश्य, चिंता ,भीती शिल्लक उरते. व्यक्तिमत्वातील काही मूलभूत फरकांमुळे किंवा इतर काही कारणांनी असे घडते .तेव्हा बरेचदा मुलाबाळांची लग्न झालेल्या साठ -पासष्ठ च्या लोकांमध्ये हे प्रकर्षाने जाणवते. आवडीनिवडी, मत सवयी फार वेगवेगळी असतात. केवळ मुले ,त्यांची जोपासना ,आजारपण ,शिक्षण ,लग्न आणि आपापल्या नोकऱ्या यात वेळ जातो. मुलांसाठी भिन्नता न दाखवता एकरुपतेने सगळं काही केले जाते.

आपल्यासारखीच समोरची व्यक्ती असणे, आपल्या कल्पना अपेक्षा पूर्ण होणे ,आवडी-निवडी समानच असणे हे खरं तर काल्पनिक म्हणा किंवा आदर्शवादी चित्र आहे. असे लोक येत एकत्र येण्याचे चान्सेस खूप कमी असतात .दोन तीन व्यक्ती जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणाहून एकत्र येतात तेव्हा त्यात मतभिन्नता असणारच. पण याकडे मतभेद या स्वरूपात जेव्हां बघितले जाते तेथे कुठल्याही सहजीवनाला तडे जातात. उलट जितकी विभिन्नता जास्त तितके समृद्ध सहजीवन असं म्हणता येईल.

बरेच प्रश्न विचारतात, काहीच सुसंगत नसेल , सुसह्य नसेल तर ? कोणताच साधारण दुवा नसेल तर? आवडी-निवडी एक असल्या तरच प्रेम टिकतं का? सगळ्या दुसऱ्याच्या मनाप्रमाणे केलं की त्याला प्रेम म्हणू का?

  • तर यासाठी माझ्याकडे उत्तर आहे,” इच्छा!” दोघांचीही एकत्र राहण्याची इच्छा असेल तर सहज संवादी सहजीवन साधता येतं.
  • दोघांचाही” इगोचे ” विसर्जन ही खूप महत्त्वाची पायरी आहे.
  • दोन व्यक्तींमध्ये जसे समान आवडी छंद असावेत याला आपण महत्त्व देतो तशी एकमेकांना पूरक अशी विभिन्नता ही हवीच. यामुळे नात्यांना मोकळा श्वास घेता येतो . समांतर रेल्वेच्या रुळांप्रमाणेच चालणारे सहजीवन उत्तम असते कारण परस्परांना अडथळे न बनता परस्परांचा विकास बघत केलेली ही स्वतंत्र वाटचाल असते. आणि सांधा बदलताना जसे रूळ एकत्र येतात तसेच संकटात हि लोक एकत्र येऊन परस्परांना साथ देतात आणि परत पुढची वाटचाल सुरळीत सुरू राहते. उलट आपली आवड जोडीदारावर थोपवणे हे जसे अयोग्य तशी ती व्यक्ती त्याबाबत उदासीन असल्याचा ग्रह करणे ही चूकच !
  • दोघांचेही अवकाश मान्य करून जिथे परस्परांच्या प्रगतीला ,विकासाला, आनंदाला, आरोग्याला दोन्ही बाजूंनी महत्त्व दिले जाते तेथे सहजीवन फुलते.
  • उत्तम सहजीवनाचा भाग हा की परस्परांच्या आवडी-निवडी हळूहळू नैसर्गिकपणे आपल्याशा वाटायला लागणे, विचारांच्या दिशा मूल्य नकळत एक होत जाणे, परस्परांबद्दलचा आदर विश्वास आत्मीयता वाढवून वयानुरूप परस्परांची काळजी वाटू लागणे, मोठेपणी मुले दूर गेल्यानंतर एकमेकांसाठी खूप वेळ घालवावा वाटणे, परस्परांचा आधार वाटणे हे सहज संवादी सहजीवनात सहज घडत जाते.
  • जिथे हा आनंद हरवतोय असं वाटतं तिथे शांतपणे बसून बोलणं महत्त्वाचं. जोडीदाराच्या समस्या हा सहजीवनातला अडथळा असेल तेथे ताण कमी करण्याचा प्रयत्न आणि छोट्या छोट्या गोष्टी एकत्र करण्यात वेळ घालवून बघावा.
  • आई-वडील संपूर्ण कुटुंब यांच्या बाबतीतील सहजीवनासाठी एकत्र जेवणखाण, सणसमारंभ साजरे करणे, त्यांच्या लहान-मोठ्या अडचणी लक्षपूर्वक ऐकणे, तिथे आपलेच कसे बरोबर आणि वेगळे आहे हे सांगण्याची गरज नसते. नुसता ऐकून घेऊन कोंडी फुटते आणि सहजिवन परत सुरु होऊ शकते.
  • पण हेही महत्त्वाचे की सातत्याने दोघांनाही या सगळ्या गोष्टींची उणीव जाणवत असेल, दोन्ही बाजूंनी इच्छेचा अभाव असेल तर ,”आता या वयात कशाला ?त्यापेक्षा चाललंय ते चालू द्या “असा विचार न करता त्यातून बाहेर पडणे हाही एक सकारात्मक विचारच आहे. पण अर्थात दोन्ही बाजूंनी शर्थीचे प्रयत्न करून झाल्यावरच !
  • महत्वाचे म्हणजे कोणत्याही सहजीवनाच्या संगोपनासाठी समुपदेशक, आणि थेरपीस्ट मदत करू शकतात .पण गरज असते ती दोघांनीही किंवा सहजीवनातील सर्व घटकांनी त्यांना भेटण्याची ! मदत मागण्याची !! व्यक्त होण्याची !!!

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER