माध्यमांची गर्दी टाळण्यासाठी चकवा देत काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक

मुंबई : बैठकीसाठी जे ठिकाण निश्चित करण्यात आलं होतं तिथे माध्यमांची प्रचंड गर्दी झाली होती. अशा स्थितीत आम्हाला चर्चा करणे केवळ अशक्य होते. त्यामुळेच आम्ही अन्य ठिकाणी ही बैठक घेण्याचे ठरवले व त्यानुसार आता बैठक सुरू झाल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. संभ्रम वाढू नये म्हणून पाटील यांनी बैठकीतून बाहेर येऊन माध्यमांशी संपर्क साधला व बैठकीची माहिती दिली.अजित पवार मुंबईतच आहेत आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरू झाली आहे, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. बैठकीचं ठिकाण सांगण्यास त्यांनी नकार दिला.

आमचा महाराष्ट्राला सक्षम सरकार देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठीच आम्ही व्यापक चर्चा करत आहोत. आजच्या बैठकीनंतर उद्या पुन्हा दोन्ही पक्षांचे नेते एकत्र बसणार आहोत, असेही पाटील यांनी सांगितले. बैठक रद्द झाली, अजित पवार नाराज आहेत, या सगळ्या अफवा आहेत.

कृपा करून कुणीही अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही पाटील यांनी केले. बैठकीला राष्ट्रवादीकडून अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे हे नेते तर काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे हे नेते सध्या उपस्थित असल्याचे पाटील म्हणाले. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात हे नेतेही बैठकीसाठी थोड्याच वेळात दाखल होतील, असे त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार आज सायंकाळी शरद पवार यांच्या भेटीसाठी ‘सिल्वर ओक’ निवासस्थानी गेले होते. तिथून साडेसातच्या सुमारास ते बाहेर पडले. त्या

वेळी माध्यमांनी त्यांना गराडा घातला असता आजची बैठक रद्द झाली आहे. मी आता बारामतीला निघालो आहे, असे सांगून ते कारमध्ये बसून निघून गेले. त्यांच्यासोबत जयंत पाटीलही होते. दरम्यान, अजित पवार यांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले. अजित पवार नाराज आहेत, असेही सांगितले जाऊ लागले. मात्र, काही वेळातच जयंत पाटील यांनी माध्यमांशी संपर्क साधून या गोंधळावर पडदा टाकला.