“पालकत्वाच्या पाऊलखुणा, मराठी साहित्याच्या अंगणा !”

Mansi

बरेचदा या मोठ्या लोकांच्या पराक्रमाच्या ,हुशारीच्या, कर्तबगारीच्या कथा ऐकल्या की मला नेहमी त्यांचे बालपण कसे बरे गेले असेल ? याची उत्सुकता वाटायची आणि मानसशास्त्राच्या अभ्यासातही एकूण वातावरणाचा मुलांच्या विकासात आणि विकासाच्या विविध पायऱ्यांवर, टप्प्यांवर होणारा परिणाम अभ्यासला होता. त्यामुळे माझी ही उत्सुकता नेहमी वाढतच गेली. त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची पाळंमुळं शोधण्याचा मी प्रयत्न करायची आणि असं करताना यासाठी मला उपयोगी पडायचं उपलब्ध मराठी साहित्य ! त्या-त्या व्यक्तीच्या चरित्र-आत्मचरित्रातून, कादंबरी व नाट्यरूपांतरातून, कुणी त्यांच्यावर लिहिलेल्या आठवणी स्वरूपातील ललित लेखना मधून, कधीतरी त्यांची भाषणे ,मुलाखती प्रकाशित होतात त्यातून, तर कधी अगदी कविता आणि अभंगांमधून सुद्धा मोठी व्यक्तिमत्व आणि त्यांच्या सभोवतालचं वातावरण ,त्याचा त्यांच्या मनावर संस्कार कसा अलगदपणे होत असे हे मला समजू लागलं. आणि आता तर तो माझा छंदच बनुन गेला !

कारण मुळात त्यावेळी पालकत्व वगैरे संकल्पना नव्हती. पण तरीही संस्कार व्हायचे ,ते कुठे थांबत होते ? उलटे जास्त आणि अविरतपणे पार मुळापर्यंत झिरपत असलेले आपल्याला दिसतात. कारण मला वाटतं आपल्यावर झालेले संस्कार, कृतीतूनच मुलांपर्यंत जे पोहोचतात ते जास्त खोलवर पोहोचतात. मुद्दाम करू म्हणून होत नाही .आणि आत्ताच आमचा प्रश्न हाच आहे की नवीन जीवनशैलीतील आमचं बदललेलं वर्तन आणि आमचे मूळचे संस्कार यातच मुळी खूप तफावत आहे.म्हणजे आम्हाला योग्य काय ते कळतं .पण काळाबरोबर धावताना मात्र त्याची अंमलबजावणी करणं जमतच नाही आणि म्हणूनच आज’ पालकत्व ‘संकल्पना मूळ धरत आहे, “स्पेशली” अमलात आणावी लागते आहे .पण मराठी साहित्य वाचताना लक्षात येत होतं की परिस्थिती अतिशय कठीण, विपरीत असली, आई-वडिलांना मुळीच वेळ जरी नसला तरी त्या सहनशीलतेतून, कष्टातून खूप शिकवण मिळत होती. आणि मग मराठी साहित्यातून असे दुवे शोधत जाण हा माझा उद्योग सुरू झाला.

मुळातच छत्रपती श्री शिवाजी महाराजांबद्दल आपल्या मनात खूप उत्सुकता असतेच. जगात पराक्रम गाजविणारा हा नेता प्रसंगी मावळ्यांसोबत दर्‍या-खोर्‍यातून हिंडणारा, त्यांची कांदाभाकर आवडीने खाणारा ,कल्याणच्या सूनेच्या बाबतीत “अशीच आमची आई असती “यासारखे उद्गार काढणारा चारित्र्यवान नेता! त्याने आपल्या मनात आधीपासूनच स्थान मिळवलेलले असते.अगदी लहानअसल्या पासून आपण त्याच्या गोष्टी ऐकतो,चवथीच्या वर्गात अभ्यासात पण वाचतो ,शिकतो.

मध्यंतरी परमानंद गोविंद नेवासकर यांनी लिहिलेला चरित्रग्रंथ” शिवभारत “वाचनात आला. याच शिवाजी महाराजांचे बालपण परमानंद यांनी फारच सुरेश शब्दात आणि वास्तव स्वरूपात वर्णन केले आहे .मुख्य म्हणजे शिवकाळात भोसले घराण्याच्या खूपच जवळील संबंधातील व्यक्तीने हे लेखन केलेले असल्याने त्या ग्रंथातील शिवकालीन घटना पूर्ण विश्वास ठेवण्यास योग्य अशा मानल्या जातात. या ग्रंथात वर्णन केल्याप्रमाणे रांगत्या वयात खेळणे, हसणे, रडणे, हट्ट करणे, दाईची नजर चुकवून माती खाणे ,खोडकरपणा असं सगळं तुमच्या आमच्या सारखेच लडिवाळ वर्णन त्यांचेही आहे.

त्यांच्यावर धार्मिक संस्कार झाले .तसेच त्यावेळच्या काळाप्रमाणे वेळोवेळी इतरही संस्कार झाले. शिवबाच्या पाचवीला तलवारही पूजली होती व नांगरही पूजिला होता. पुढेही शिवबाचे प्रेम त्याप्रमाणे पुढे भवानीदेवीच्या तलवारीवर आणि बलरामाप्रमाणे नांगरावर ही होते, आणि त्यांनी त्याचे सगळे आयुष्य मावळी सैनिकाकरता आणि शेतकऱ्यां करता वाहून घेतलेले इतिहास आपल्याला सांगतोचं !

शिवचरित्राचे गाढे अभ्यासक श्री बाबासाहेब पुरंदरे यांनी एका लेखात शिवबाचे शिक्षण, जिजाऊसाहेबांकडून त्यांना मिळालेले संस्कार ,लष्करी बाबींसाठी समोर असणाऱ्या शहाजी राजांचा इतिहास ,मिळालेली उत्तम महत्त्वाकांक्षा या सगळ्यातून आंतरराष्ट्रीय कीर्तीचा सेनापती म्हणून त्यांची घडण कशी झाली ,ते कसे घडत गेले याचे सुंदर वर्णन आहे.
त्यातूनही त्यांच्या वाट्याला आलेल पालकत्व मला हळूहळू कळू लागलं !

ते लिहितात की शिवबा अत्यंत तल्लख बुद्धीचा .एकदां शिकवलेलं कि शिकणारा आणि त्यात तरबेज होणारा! मग ती घोड्यावरची दौड असो हत्ती चालवणे वा हत्यार चालवणे. दादोजी कोंडदेव यांची मुद्दाम नियुक्ती त्यांच्यासाठी जिजाऊसाहेबांनी केली होती.

जिजाऊसाहेब लोकांचे भांडण तंटे सोडवण्यात ,निकाल देण्यास न्यायगादीवर बसत. या दोन्ही बाजू ऐकून घेत निर्णय करत. यावेळी त्यांचे वागणे ,बोलणे ,समजूतदारपणा शिवबा प्रत्यक्ष अनुभवत. त्यातूनच मराठी मुलखाला न्यायी नीतिवान राजा मिळाला.

त्याच प्रमाणे अनुयायी कसे मिळवायचे ? त्यांना शिकवून त्यांच्याकडून लहान मोठी कामे जबाबदारीची व अवघड सुद्धा कशी करून घ्यायची हे नेतृत्वाचे आणि संघटनेचे बाळकडू त्यांना जिजाऊसाहेबांनी कडूनच मिळाले. शिवबान बद्दल एका पत्रात उल्लेख आढळतो,” राजश्री श्री तो ऐसे की माणसाचे माणूस वालखिताती ! म्हणजे कार्यातला माणूस आणि माणूस महाराज अचूक ओळखत होते. जोडत होते त्यांच्याप्रती जनतेत प्रेम निष्ठा व दरारा ही निर्माण होत होता.

लष्करी बाबतीत तीर्थरूप शहाजी महाराजांचा ताजा इतिहास समोर होता. इसवी सन १६२४ च्या ऑक्टोबर मध्ये शहाजी राजांनी दिल्लीच्या मोगली फौजेचा व विजापूरच्या आदिलशाही फौजेचा एकाच वेळी भातवडीच्या रणांगणात वर पराभव केला .खर तर शहाजीराजांची फौज खूप कमी होती. हा गनिमीकाव्याचा अचाट विजय होता. पुढे याच गनिमी काव्याचा वापर शिवाजी महाराजांनी अफजल खान, फत्तेखान, शाहिस्तेखान यासारख्या प्रचंड बळाच्या लोकांवर वापरला.

जिजाऊ साहेबांनी अगदी लहानपणापासूनच त्यांची राजमुद्रा तयार केली. त्यावेळी ते केवळ नऊ वर्षांचे होते. त्यावर लिहिले होते ,”प्रतिपश्चंद्रलेखे वर्धिष्णू विरश्व वंदिता”हे शब्द उत्तुंग ध्येयवाद आणि अतीव महत्त्वाकांक्षेचे प्रतीक आहे. समोर एवढी मोठी महत्त्वाकांक्षा ठेवल्यामुळेच ते वयाच्या अठराव्यावर्षीच बिलसर – सासवडच्या लढाईत त्यांनी पहिला विजय मिळवला. आणि पुढे स्वकीय व परकीय अशा अनेक सेनानीचा पराभव करून एक असामान्य, दिग्विजय सेनानी बनले. बालवयातील साधारण मुलापासून तो इथपर्यंतचा त्यांचा प्रवास हा बालवयापासून त्यांना पालकांकडून मिळालेल्या बाळकडूचाच परिणाम होता हे नक्की !

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER