फूटबॉलचा आणखी एक ‘हिरा’ गेला, पावलो रोसी देवाघरी

Paolo Rossi

2020 ने दिएगो मॅराडोना (Diego Maradona) यांच्यानंतर फूटबॉलचा (Football) आणखी एक हिरा हिरावुन नेला आहे. इटलीचे (Italy) विश्वविजेते फूटबॉलपटू पावलो रोसी (Paolo Rossi) हे 64 वर्षे वयात देवाघरी गेले आहेत. इटलीच्या 1982 च्या विश्वविजयाचे ते शिल्पकार होते. ते ज्या टेलिव्हिजन वाहिनीसाठी समालोचन करायचे त्यात आरएआय स्पोर्टस् वाहिनीने त्यांच्या निधनाचे वृत्त दिले आहे. असाध्य आजाराने ते आपल्याला सोडून गेले असल्याचे या वाहिनीने म्हटले आहे. ही अतिशय दुःखद वार्ता आहे असे आरएआय स्पोर्टचे सादरकर्ते एन्रीको व्हारियाल यांनी व्टिट केले आहे.

‘पाब्लिटो’ नावाने लोकप्रिय असलेल्या रॉसी यांच्या पत्नी फ्रेडरिका कॕपैल्लैटी यांनी त्यांचे दोघांचे एक छायाचित्र इन्स्टाग्रामवर पोस्ट केले असून त्याला पर सेम्प्रे म्हणजे सदैव अशी फोटोओळ दिली आहे.

1982 मध्ये इटलीला विश्वविजेते बनविण्याशिवाय रोसी यांनी युवेंटस क्लबसाठी मोठी कामगिरी केली आहे. ‘सेरी ए’ ची दोन विजेतेपदं, एकदा युरोपियन कप आणि कोपा इटालियाचे विजेतेपद पटकावले आहे. 1982 मध्ये इटलीच्या विश्वविजयात त्यांनी सहा गोल केले होते. त्यात ब्राझीलविरुध्द केलेल्या हॕट्ट्रिकचा समावेश आहे. ह्या कामगिरीने त्यांनी आपल्या टीकाकारांना गप्प केले होते कारण या विश्वचषकासाठी त्यांच्या निवडीवरच काही जणांनी टीका केली होती.

फूटबॉल जगतात कधीही ब्राझीलवर विजय ही फार मोठी कामगिरी मानली जाते. विश्वचषक स्पर्धेत तर त्याचे महत्त्व कितीतरी पटीने वाढते. 1982 च्या स्पर्धेवेळी ब्राझिलियन संघात झिको, साॕक्रेटस्, फाल्काओ, एडर व सेरैझो असे खेळाडू होते आणि त्या सामन्यात या आक्रमणाविरुध्द पाब्लिटो पुन्हा पुन्हा गोल करुन इटलीला आघाडीवर नेत होता.दोन वेळा ब्राझीलने बरोबरी साधली पण शेवटी रोसीने तिसऱ्या गोलसह हॕट्ट्रिक करत इटलीला 3-2 असा विजय मिळवून दिला होता.

ब्राझीलविरुध्दच्या हॕट्ट्रिकने व त्यामुळे मिळालेल्या 3-2 अशा थरारक विजयाने इटलीचा उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला होता आणि उपांत्य लढतीतही इटलीने 2-0 असा जो विजय मिळवला ते दोन्ही गोल रोसी यांनी केले होते. रोसींची विजयी योगदानाची कामगिरी एवढ्यावरच थांबली नाही तर अंतिम सामन्यातही पश्चिम जर्मनीविरुध्द त्यांनी पहिला गोल केला होता आणि तो सामना 3-1 असा जिंकून इटलीने तिसऱ्यांदा आणि 1938 नंतर पहिल्यांदाच विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले होते. त्यावेळी अर्थातच पाब्लिटो यांनी गोल्डन बूट व गोल्डन बॉल हे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचे पुरस्कार जिंकले होते. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील ही अजुनही विश्वविजयाची सर्वोत्तम एकहाती कामगिरी मानली जाते.

पाब्लिटो यांना श्रध्दांजली वाहताना जर्मनीच्या माजी विश्वविजत्या युर्गेन क्लिन्समान यांनी म्हटले आहे की, प्रिय पाब्लिटो, आम्ही तुला कधीच विसरु शकणार नाही!

इटलीच्या तुस्कानी प्रांतातील प्राटो गावाचा हा खेळाडू आपल्या कारकिर्दीत नेहमीच आपल्या देशातील क्लबासाठीच खेळला. 1980 मध्ये मॕचफिक्सिंगच्या आरोपावरुन त्यांना तीन वर्ष बंदीची शिक्षा झाली होती पण त्यांनी नेहमीच या आरोपांचा इन्कार केला होता. नंतर ही बंदी दोन वर्षांची करण्यात आली होती त्यामुळे ते 1982 च्या विश्वचषक स्पर्धेत खेळून इतिहास घडवू शकले होते.

त्याआधी 1978 च्या विश्वचषक स्पर्धेतही त्यांनी तीन गोल केले होते. याप्रकारे विश्वचषक स्पर्धेत एकूण नऊ गोल त्यांच्या नावावर आहेत. यासह विश्वचषक स्पर्धेत इटलीसाठी सर्वाधिक गोलांच्या बाबतीत रॕबर्टो बॕजियो व ख्रिस्तियन व्हिएरी यांच्या ते बरोबरीवर आहेत.

1986 चा गोल्डन बूट विजेता आधीच स्वर्गात गेलेला आहे. आता1982 चा गोल्डनबूट विजेता त्याला जाऊन मिळणार आहे आणि हे दोघे वरच्याला फूटबॉलची जादू आणि फूटबॉलची मजा काय असते ते दाखवल्याशिवाय राहणार नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER