नर्सच्या नादाला लागून ‘या’ राजकीय नेत्यांचा राजकीय खेळ झाला होता खल्लास

Following the sound of the nurse

पैसा… पैसा सर्वांनाच हवाय. मग तो कमावताना योग्य-अयोग्य मार्गाचा विचार होईलच असा नाही. या पैशाच्या नादात एका नेत्याचा पोलिटिकल गेम झाला होता. भंवरीदेवी एक साधारण पण अतिशय महत्त्वाकांक्षी नर्स. दिसायला देखणी आणि डोकेबाज. राजस्थानच्या राजकारणात तिनं भूकंप केला होता. यात दोन बड्या नेत्यांची कारकीर्द संपली. राजस्थानचे माजी जलसंधारण मंत्री महीपाल मदेरणा तर दुसरा आमदार मलखानसिंग बिष्णाई.

जोधपूरजवळच्या पेनन नावाच्या गावातल्या सरकारी इस्पितळात भंवरीदेवी नर्स होती. राजस्थानच्या या नर्सला राजस्थानी चित्रपटसृष्टीत हिरोईन म्हणून आपले स्थान बनवायच्या ध्येयानं झपाटलं होतं. त्या काळात लोकगीत-संगीताच्या ऑडिओ-व्हिडीओ  सीडीचा व्यवसाय टीपेवर होता. ती त्या  व्हिडीओत  डान्सर आणि अभिनेत्री म्हणून काम करायची. या ग्लॅमरच्या उठाठेवीत नोकरीकडं दुर्लक्ष करायची. त्या गावातलं हे एकमेव हॉस्पिटल आणि ही एकमेव नर्स. ग्रामस्थांच्या कलेक्टरकडं तक्रारी जाऊ लागल्या. कलेक्टरनं  भंवरीदेवीला नोकरीवरून बडतर्फ केलं. भंवरीदेवी मदत मागायला आमदार मलखानसिंग बिष्णोईकडे गेली. तिथून तिचे मलखानसिंगशी सूत जुळले. तिच्या कामासंदर्भात मलखानसिंगनं कॅबिनेट मंत्री महीपाल मदेरणाकडे नेलं. तिथून महीपाल मदेरणाही तिच्या घोळात आला.

कलेक्टरला फोन गेला. भंवरीची नोकरी परत आली. दोन बड्या धेंडाशी मेतकूट आणि त्यातून झालेला राजस्थानच्या वर्तुळातला प्रवेश हिकमती भंवरीच्या पथ्यावर पडला. ती लोकांची अडकलेली कामं मार्गी लावू लागली. ऐसपैस घर झालं. गाडी आली (ही मारुती स्विफ्ट तिला मदेरणाकडून मिळाल्याचं सांगितलं जातं). तिला राजकीय ताकद काय करू शकते हे समजलं. तिच्यातली हिरोईन  बनण्याच्या महत्त्वाकांक्षेवर नेता बनण्याच्या महत्त्वाकांक्षेनं मात केली. तिनं मदेरणाकडे थेट आमदारकीचं तिकीट मागितलं. झालं… इथं तिचे दिवस फिरले. आधी स्पष्ट नकार देऊन… त्यानंतर पक्षात वरिष्ठांना विचारावं लागेल वगैरे अशा बहाण्यानं त्यांनी भंवरीदेवीचा इच्छित राजकीय प्रवेश लांबवला.

जाणीवपूर्वक हे आपल्या मागणीकडे दुर्लक्ष करतात हे तिच्या लक्षात आलं. मग तिनं थेट ब्लॅकमेलिंगचे मार्ग अवलंबले. त्यातला पहिला होता ‘मदेरणा आणि मलखानसिंगसोबतच्या शरीरसंबंधांची सीडी आपल्या’कडे असल्याचा.दुसरा होता आपल्या तीन आपत्यांपैकी लहान मुलगी ही मलखानसिंगची असल्याचा. मदेरणा आणि मलखानसिंगच्या पायाखालची जमीन सरकली. पण दोघेही बधेनात. तिला टाळू लागले. अनेक दिवस तिला तंगवल्यानं वैतागलेली भंवरी सरळ मदेरणाच्या बंगल्यावर गेली. पण मदेरणाच्या आदेशानं तिला गेटवरूनच सुरक्षा रक्षकांनी बळजबरीनं पिटाळून लावलं. अपमानानं पेटलेली भंवरी थेट बीजेपीच्या स्थानिक कार्यालयात गेली. तिनं आपल्याकडे असलेल्या सीडीचा उल्लेख केला. तिथं उपस्थित असलेल्या मीडियाच्या मंडळींच्या कानावर गेलं आणि मीडियानं त्यावेळी कथित  असलेल्या सीडीवर राजस्थान सरकारला बडवायला घेतलं. मदेरणा व मलखान नरमले. भंवरीदेवीसोबत त्यांची मांडवली झाली. म्हटलं जातं की, सीडीपोटी ६० लाखांचं तोडपाणी केलं होतं. सगळं सुरळीत झाल्यासारखं वाटू लागलं होतं. त्या दरम्यानच तिनं आपली स्विफ्ट कार चार लाखांना विकली. मलखानचा भाचा सोहनलालसोबत सौदा पक्का झाला होता.

सोहनलालनं १ सप्टेंबर २०११ ला सीडींच्या मांडवलीचे ६० लाख आणि कारचे चार लाख घ्यायला तिला बोलावलं. ती गेली. त्यानंतर ती परत आलीच नाही. जवळपास १२ दिवसांनी भंवरीच्या  नवऱ्यानं पोलिसात तक्रार करून मदेरणा आणि मलखानसिंचं थेट नाव घेतलं. सेक्स आणि पॉलिटिक्सच्या सीडीवाली स्फोटक मसाला स्टोरी देशभरातला मीडिया थोडाच सोडणार. हा हा म्हणता भंवरीदेवीचं प्रकरण देशात चघळलं जाऊ लागलं. पोलीस तपास सुरू झाला. पोलिसांवरच्या राजकीय दबावामुळे तपास वेगानं होत नाही म्हणून हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं. त्याच दरम्यान मदेरणा आणि भंवरीदेवीच्या शरीरसंबंधांची सीडी चॅनल्सच्या हाती लागली. भारतातातल्या विशेषतः राजस्थानच्या चॅनल्सनी ती डंके की चोट पे वाजवायला घेतली. मंत्री मदेरणा गायब झाले आणि राजस्थानचं अशोक गेलहोत सरकार पुरतं हादरलं. चार महिन्यानंतर भंवरीचे अवशेष सापडले. फॉरेन्सिक चाचणी अमेरिकेच्या एफबीआयनं करून ते अवशेष भंवरीचे असल्याचा अहवाल दिला. सीबीआयनं जानेवारी २०१२ ला मदेरणा आणि मलखानसिंगला अटक केली.

Disclaimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER