फोकस ऑन चेंजिंग यूवरसेल्फ

Focues On Change Yourself

प्रिय रचना,
आपण दोन तीन दिवसापूर्वी फोनवर बोलल्याप्रमाणे माझे रुटीन आणि दिनक्रम आता छान बसलाय. मुख्य म्हणजे मी अतिशय शांततेने प्रत्येक काम करते .म्हणजे तसा प्रयत्न तरी करतेच आहे. बरेच यश पण येते आहे .माझ्या कुठल्याही प्रश्नाकडे तटस्थ राहून विचार करायला जमतय !

तुझा काल फोन आला ,तेव्हापासून मी स्वतः खूप अस्वस्थ आहे .अर्थात यावर मी मार्गही शोधलाय विचार करून. (नाहीतर तू म्हणशील परत अस्वस्थ झालीस ना माझ्या चिंतेने म्हणून सांगते मॅडम ! )

तू काल म्हणत होतीस ,मीच नेहमी स्वतःत बदल करायचा का ? चिनू ,शांतता आपण आपल्या आतून शोधायची ठरवली आहे. लक्षात आहे ना ?आपली आई नेहमी सांगायची की कधीही समोरच्यातले दोष दाखवताना चार बोटे आपल्याकडे वळलेली असतात हे लक्षात ठेवायला हवं. तुझ्या वयाप्रमाणे ,”मीच नेहमी का ? “असं वाटणं साहजिक आहे. आता पाच सहा वर्षांनी कदाचित तुलाहि सून येऊ शकेल. तरी अजून बदल मीच करायचा स्वतः ! हे नक्कीच त्रासदायक वाटते. पण हे बघ ,मोठ्या वडीलधारी मंडळीमध्ये त्यांच्या या वयाला आता बदल करणे शक्य होणार नाही. ही काळया दगडावरची रेघ आहे. आणि आता तुझ्या वाढत्या वयाबरोबर डोक्याला त्रास करुन घेणे तुला परवडणारे नाही. मग दगडावर डोके आपटायला जायचे की नाही? याचाच विचार करावा लागेल.

त्यासाठी पहिल्या क्रायटेरिया लाव की, तुला त्या सूचना , तो बदल योग्य वाटतो का ? म्हणजे त्यात खरंच काही तथ्य आहे का ? काल आपण मनाच्या शांततेकडे बघताना बोललो, त्याप्रमाणे काठावर उभे राहून आपण या घटनांकडे तठस्थपणे बघायचे आहे. त्यासाठी मन शांत ठेवणे गरजेचे आहे.

तुझ्यासाठी शांततेच्या आड येणाऱ्या गोष्टी म्हणजे ,पूर्वग्रह आणि नात्यांमधल्या गुंतागुंत. त्यांचा चष्मा लावून बघशील तर सारासार विवेक हरवशील .त्यामुळे शांतपणे ऐकून योग्य वाटेल योग्य वाटेल ते घे, आत्मसात कर! पटले नाही तर सरळ बाजूला टाक. त्यावर विचार करणे ताबडतोब बंद कर.

दुसरी गोष्ट आपले बाबा नेहमी काही शिकवण द्यायची असेल तर गोष्टी सांगायचे आणि त्यातून नकळत चांगली गोष्ट सांगायचे .म्हणूनच आपल्यालाही ती छान सवय लागली. आई मात्र सतत मोठमोठी भाषणे द्यायची, तुला आठवतं आपण आईला म्हणायचो की ,”आई आता झालं का ?”( लेक्चर) अध्याहृत होते. कारण आपली ते म्हणायची प्राज्ञा नव्हती. आता मुले ती आपली वाक्य पुर्ण करतात.

आपणही अजूनपर्यंत अशा कथांमधून जास्त परिणामकारकरित्या शिकतो. आणि मी आता संजनाच्या छोट्या सईला गोष्टीच सांगते .म्हणूनच आजी प्रिय आहे बाईसाहेबांना. आहे फक्त तीन वर्षांची पण अक्कल मात्र भारी !

तर स्वतः बदल करणे ,किती गरजेचे यासाठी ही गोष्ट ऐक. एक लहान मुलगा रोज प्रार्थना करत असे. रोज परमेश्वराजवळ तो म्हणत असे,” देवा ! मला संपूर्ण जगात परिवर्तन करायचे आहे. तर मला जग बदलण्याची शक्ती दे !”अनेक वर्ष तो प्रार्थना करत होता. पण आपल्याला कोणतीही शक्ती मिळाल्याचे त्याला फारसे जाणवत नव्हते .आता तो तरुण झाला होता. जग बदलण्याचे लक्ष फारच असल्याने ,ते आता त्याला शक्य वाटत नव्हते. त्याने प्रार्थनेत बदल करण्याचे ठरवले. आता तो रोज देवाजवळ प्रार्थना करत असे,” देवा ! माझ्या जवळचे अवतीभवतीचे असलेले लोक बदलण्याची शक्ती दे !” अशी प्रार्थना करूनही अनेक वर्षे निघून गेली. आता तो वृद्धत्वाकडे झुकू लागला होता. त्याला कोणतीही शक्ती प्राप्त होत नव्हती .आजूबाजूचे लोकही बदलण्याची चिन्हे दिसत नव्हती .लोक बदलल्याशिवाय जगाची प्रगती कशी होईल ? जग सुखी कसे होईल ? याची त्याला चिंता होती . लहानपणापासूनच विश्व बदलण्याचे स्वप्न त्याने पाहिले होते ,पण ते सफल होण्याचे चिन्ह दिसत नव्हते .कदाचित आपल्या प्रार्थनेत काहीतरी उणीव राहिली असेल ,असा विचार त्याच्या मनात आला .आता जगाला किंवा आजूबाजूच्या लोकांना बदलणे शक्य नाही हे त्याच्या लक्षात आले .

जग बदलण्याची आता त्याला इच्छाही नव्हती . पुन्हा आपल्या प्रार्थनेत बदल केला पाहिजे असे त्याला वाटायला लागले . आणि त्याने प्रार्थना सुरू केली,” देवा ! स्वतःला बदलण्याची शक्ती दे !” त्याला स्वतःमध्ये एका नवीन शक्तीची जाणीव व्हायला लागली. प्रामाणिकपणे त्याने स्वतःमध्ये अनेक बदल केले .काही दिवसातच आजूबाजूच्या जगातही बदल होत असल्याचे त्याला जाणवायला लागले . उशिरा का होईना ,त्याला सत्याचा साक्षात्कार झाला. असे म्हणतात .

दुसऱ्याला समजणे खूप सोपे असते ,स्वतः ला समजणे मात्र खूप कठीण असते. गुलजार यांनी एका ठिकाणी म्हटले आहे,” उम्र जाया कर दी लोगो ने , औरोंके वजूदमे नूक्स निकालते निकालते l इतनाही खुदको तराशा होता , तो कबके फरिश्ते बन जाते ….! “

तेव्हा मनाशी पक्के ठरवून टाक. आणि सहजतेने तू हे साध्य करशील याची खात्री आहे मला !

तुझीच ,
सौ ताई .

मानसी गिरीश फडके
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER