आस्ताद आणि स्वप्नालीच्या घरी वाजणार सनई

Aastad Kale - Swapnali Patil

तुळशीचे लग्न लागल्यानंतर दर आठवड्याला एकातरी सेलिब्रिटीचा विवाह सोहळा झाल्याच्या फोटोंनी सोशल मीडियावर अनेक पेज झगमगले आहेत. शर्मिष्ठा राऊत अभिज्ञा भावे, मधुरा जोशी ,सई लोकूर,कार्तिकी गायकवाड,मानसी नाईक मिताली मयेकर, सिद्धार्थ चांदेकर यांच्यानंतर आता अभिनेता आस्ताद काळे (Aastad Kale) आणि स्वप्नाली पाटील (Swapnali Patil) यांच्याही मनात शादी के लड्डू फुटायला सुरुवात झाली आहे. गेल्या सात-आठ वर्षांपासून ही जोडी रिलेशनशिपमध्ये असून आता लवकरच ते दोनाचे चार हात करणार आहेत. या दोघांची कॉमन मैत्रीण अभिनेत्री मेघा घाडगे हिने नुकतच त्यांना केळवण दिलं आणि त्यानंतर आता त्यांना लग्नाचे वेध लागले आहेत. अजून तरी दोघांच्या लग्नाची तारीख जाहीर झाली नसली तरी येत्या काही दिवसात स्वप्नाली ही काळे यांच्या घरची सून होणार आहे.

आस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील एका मालिकेत पहिल्यांदा भेटले. या मालिकेत त्यांचा ट्रॅक का बहीण आणि भाऊ या नात्याचा होता पण तो ट्रॅक संपला आणि ते आपापल्या कामात व्यस्त झाले. त्यांची गाठ पडली ती पुढचं पाऊल या खूप लोकप्रिय आणि गाजलेल्या मालिकेत. अर्थात या मालिकेत सुरुवातीपासूनच आस्ताद काम करत होता तर स्वप्नाली ची एन्ट्री नंतर झाली. पुढचं पाऊल या मालिकेत आस्तादची दुसरी पत्नी म्हणून स्वप्नाली पुढचं पाऊल या मालिकेच्या फ्रेममध्ये आली आणि पुढे आस्तादच्या आयुष्याच्या फ्रेममध्येदेखील एक खास व्यक्ती म्हणून आली. पुढचं पाऊल ही मालिका सुरू असेपर्यंत या दोघांच्या नात्याबद्दल कुठेच चर्चा नव्हती.

आस्ताद सांगतो, स्वप्नाली या मालिकेत आली तो मार्च महिना होता आणि पुढच्या तीन महिन्यात म्हणजे जून मध्ये स्वप्नाली मला आवडायला लागली होती. त्याच वेळी ठरवलं की स्वप्नालीला आपण लग्नाविषयी विचारायचं.

आस्तादचा स्वभाव खूप थेट आहे. त्याला जे वाटतं ते तो बोलून दाखवतो. सहाजिकच स्वप्नाली त्याला आवडते हे सांगायलादेखील त्याने फार वेळ घेतला नाही आणि एक दिवस त्याने त्याच्या मनातली गोष्ट स्वप्नालीला सांगितली. पण स्वप्नाली कडून मात्र हे लव्ह अॅट फर्स्ट साइट नव्हतं. तिने विचार करायला वेळ मागितला. हा वेळ किती होता तर तो तब्बल एक वर्षाचा वेळ तिने घेतला आणि मग स्वप्नालीने तिचा होकार सांगितला. चार-पाच वर्ष होऊन गेली. दरम्यानच्याकाळात आस्तादच्या आयुष्यातअनेक चढ-उतार आले. सरस्वती मालिकेनंतर त्याच्या आयुष्यात काही अशा घडामोडी घडल्या की त्यांना लग्न करणं शक्य नव्हतं. मात्र त्या काळात स्वप्नालीने खूप चांगली साथ दिली. आस्ताद पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला तो बिग बॉसच्या पहिल्या सीझनमुळे. या सीजनमध्ये स्वप्नालीसोबत असलेल्या नात्याला जाहीरपणे कबूल केलं आणि लवकरच तिच्याशी आपण लग्न करणार असल्याचं सांगितलं. जेव्हा आस्ताद बिग बॉसच्या घरातून बाहेर आला त्यानंतर स्वप्नाली आणि आस्ताद पुन्हा भेटले आणि लग्न करण्याच्या दृष्टीने त्यांची तयारी सुरू झाली.

काही दिवसांपूर्वीच संपलेल्या सिंगिंग स्टार या शो मध्ये आस्तादने त्याच्या गाण्याची जादू प्रेक्षकांना दाखवली. हा शो सुरू असताना आस्ताद आणि स्वप्नालीचे छोटेसे भांडण झालं होतं आणि स्वप्नाली त्याच्याशी बोलत नव्हती, ती त्याला भेटत नव्हती. त्या शोमध्ये त्याने नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होई हे गाणं अतिशय उत्कृष्ट सादर केल्यानंतर परीक्षकांनी याला या गाण्यातील भावना या अगदी खर्‍याखुर्‍या असल्यासारखे वाटल्या याचे कारण विचारलं तेव्हादेखील त्याने स्टेजवरून हे गाणं खास स्वप्नालीसाठी असल्याचे त्यांना सांगितलं होतं. कारण त्यावेळी स्वप्नाली त्याच्यावर रागवून त्याच्यापासून दूर गेली होती आणि त्याच भावनेतून हे गाणं इतकं चांगलं झालं हेही त्याने कबूल केलं होतं. कदाचित ही भावना स्वप्नालीपर्यंत पोहोचली असावी आणि स्वप्नाली सगळा राग विसरून पुन्हा आस्तादशी बोलायला लागली आणि आता लवकरच ही जोडी लग्न करणार असल्याने आस्ताद आणि स्वप्नाली यांच्या चाहत्यांनाही खूप आनंद झाला आहे.

लवकरच आस्ताद हा चंद्र आहे साक्षीला या मालिकेत दिसणार आहे. सध्यातरी या मालिकेतील त्याची भूमिका नेमकी काय आहे हे गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. परंतु एकीकडे लग्नाची तयारी आणि दुसरीकडे मालिकेतील इंट्री यामुळे आस्तादला डबल ट्रीट मिळाली आहे त्यामुळे तो भलताच खुश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER