पाचगणी येथील टेबललॅन्डवर बहरला विविध रंगी फुलोत्सव

Pachgani

सातारा : पाचगणी येथील टेबललॅन्ड (Pachgani) पर्यटन स्थळ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या बंद आहे. येथे सध्या विविध रंगी फुलोत्सव बहरला आहे. लॉकडाऊनमुळे संपूर्ण पावसाळ्यात या ठिकाणी कोणच फिरकले नाही. मानवी उपद्रव थांबल्याने यावर्षी टेबललँडवर रंगीबेरंगी फुलांना चांगलाच बहर आला. निसर्गाचे नयनरम्य दृश्य टेबललॅन्ड परिसरात पाहायला मिळत आहे. दरवर्षी येणाऱ्या दुर्मीळ वनस्पती, त्यांची पाने, फुले मनसोक्त बहरल्याने या परिसरातील नजारा काही औरच दिसत आहे.

पावसाळा संपतानाच येथे निसर्ग विविध दुर्मीळ व रंगीबेरंगी फुलांची उधळण करत असतो. हा फुलोत्सव नजरेत भरण्यासारखा असतो. यामध्ये निसर्गाच्या अद्भुत गंमती जंमती पहावयास मिळतात, ज्या आपण कधीही अनुभवल्या नसतील. सध्या लाल, सफेद, पिवळी, नारंगी अशा विविध रंगांची फुले याठिकाणी बहरली आहेत. पिवळी सोनकी, मिकीमाऊस स्मिथिया, टूथब्रशच्या आकाराची फुले, आर्किड, जांभळी फुले, सीतेची आसवे अशी अनेक प्रकारची फुले येथे पाहायला मिळत आहेत.काही फुलांची शास्त्रीय नावे अशी, ऍरियकॉलची पांढरी फुले, कॉमेलिना अन युट्रीक्युलेरिया जांभळी फुले, क्लोरो फायटम, हाबेनारिया, आर्किडस्टम, नाजूक नखरेल फुले, श्वेतपुष्पी म्हणजेच थनब्रजीया, वेलाची लहान फुले, गौरी गणपतीच्या पूजेसाठी लागणारी भारंगी म्हणजेच सक्रोबा. ओल्या पठाराच्या खडकात चिकटलेले शेवाळ, झाडांना, दगडांना वेढणारे चंदेरी नेचे म्हणजेच सिल्वर फ्रन, सीतेचे केस आदी वनस्पती येथे पाहायला मिळत आहेत. पावसाळा सुरू होताच या भागात जेष्ठ आमरी, हाबेनारिया, ग्रँडी फुलोरा, आषाढ आमरी हाबेनारिया, लाँगी कॉरकरटा व आर्किडसचे दर्शन होते. सध्या पठारावर लाल, पिवळा, गुलाबी तेरडा चहूबाजूंनी हसताना दिसत आहे. अशा नाना प्रकारच्या फुलांनी सद्या पठार फुलून गेले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER