नागपूर जिल्ह्यात पुराचे थैमान, अनेक ठिकाणी घरांची पडझड

Floods in Nagpur

नागपूर : गेल्या २४ तासांत झालेल्या पावसामुळे नदीनाल्यांना पूर आला असून पाणी घरांत शिरले. यामुळे मोठे नुकसान झाले असून २५ गावांतील २ हजार ९०० कुटुंबे  बेघर झाली. पाण्यामुळे अनेकांच्या घरांची भिंत खचली आणि चूल विझल्याचे चित्र आहे. पावसामुळे पिकांचेही मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.

शुक्रवार सकाळपासूनच संततधार सुरू आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. नागपूर जिल्ह्यात ८१.४३ मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली असून नवेगाव खैरी व तोतलाडोह प्रकल्पाचे अनुक्रमे १६ व १४ दरवाजे उघडण्यात आले आहे. यामुळे चार तालुक्यांतील २५ गावांमध्ये पाणी शिरले. यात २ हजार ९०७ कुटुंबांतील ११,०६४ व्यक्ती बाधित झाले. यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. मौदा तालुक्यातील मौदा शहर, चेहाडी, सुखडी, नेरला, किरणापूर, कुंभारपूर, सिंगोरी, झुल्लर तसेच वडना ही नऊ  गावे बाधित झाली आहेत.

कामठी तालुक्यातील गोराबाजार, सोनेगाव, अजनी, भामेवाडा, जुनी कामठी, बिना, नेरी तसेच बिडबिना ही आठ  गावे, पारशिवनी तालुक्यातील काळाफाटा, पिपरी, जुनी कामठी, सिंगारदीप, सालई मावली तसेच पाली ही सहा गावे तर कुही तालुक्यातील चिचघाट तसेच आवरमारा या दोन  गावांत पाण्याने नुकसान झाले आहे.

घरे पडली…

अतिपावसामुळे नगरधन येथील जवळपास १५ ते २० घरे पडली, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य दुधराम सव्वालाखे यांनी दिली. माहिती मिळताच त्यांनी नगरधनला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. पटवाऱ्यांना फोनवरून माहिती देत पंचनामा करण्याची सूचना केली. नगरधनचे सरपंच प्रशांत कामडी, पिंटू नंदनवार, वाघमारे, राजू गडपायले, स्नेहदीप वाघमारे, सुरेंद्र बिरनवार व गावकरी यावेळी उपस्थित होते. नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी त्यांनी केली.

तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा : कुंभारे

कळमेश्वर, सावनेर तालुक्यांसह संपूर्णच जिल्ह्यात पावसामुळे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून मदत देण्याची मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व गटनेते मनोहर कुंभारे यांनी केली. तर एसडीआरएफ व एनडीआरएफ यांच्या सेवेसह आर्मीचे पथक बचाव कार्य करीत आहेत. सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले, अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER