विभागातील 14 तालुक्यांना पुराचा फटका ,48 हजाराहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले

सैन्य दलाची मदत, नागरिक पुनर्वसन केंद्रात

Nagpur - Bhandara - Gadchiroli - Chandrapur Floods

नागपूर : अतिवृष्टीमुळे पूर्व विदर्भातील भंडारा (Bhandara), नागपूर (Nagpur), चंद्रपूर (Chandrapur), गडचिरोली (Gadchiroli) या जिल्ह्यांना मोठा फटका बसला असून जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. बचाव पथकांचे कार्य वेगाने सुरु असून नागरिकांचे जीव वाचविण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. बचावकार्यासाठी सैन्यदलाची मदत घेतली आहे. प्राथमिक अंदाजानुसार विभागातील 14 तालुक्यांना पुराचा जोरदार फटका बसला असून 90 हजार 858 नागरिक पूर बाधित आहेत. पैकी 47 हजार 971 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यंत्रणेला यश आले आहे. विभागात एकूण 138 पुनर्वसन केंद्रात 9 हजार 982 पूर बाधितांना तात्पुरत्या निवारा केंद्रात हलविण्यात आले.

विभागीय नियंत्रण कक्षात प्राप्त माहितीनुसार आज तीन वाजेपर्यंत नागपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी, कुही येथे सैनदलाच्या मदतीने मदत कार्य करण्यात आले. नागपूर जिल्हयातील 5 तालुक्यामध्ये 61 गावे बाधीत झाली आहे.4911 कुटुंबातील 28 हजार 104 व्यक्तींना सुरक्षीत स्थळी हलविण्यात आले आहे.जिल्हयातील मौदा,कामठी,पारशिवणी,कुही, सावनेर या तालुक्याला फटका बसला आहे.तर भंडारा जिल्ह्यात पवनी, लाखांदूर, भंडारा येथे एनडीआरएफच्या दोन व भंडारा, मोहाडी, तुमसर येथे एसडीआरएफ दोन चमूंनी बचत कार्य केले. चंद्रपूर जिल्ह्यातील लाडज येथे दोन एनडीआरएफ चमू व लाडज व बेलगाव येथे दोन एसडीआरएफच्या चमूंनी मदत कार्य केले.

भंडारा जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावर पुराचा तडाखा बसला असून 55 हजार लोक पूर बाधित झाले आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मदत कार्य सुरु असून 62 निवारा केंद्रात 1369 लोकांना हलविण्यात आले आहे. साधारण 14 हजार 813 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात 21 गावातील 4 हजार 859 लोकांना फटका बसला असून 3 हजार 159 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात चार निवारा गृहात हलविण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वडसा, आरमोरी व गडचिरोली तालुक्यातील दहा गावे बाधित असून 2 हजार 98 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. दहा पुनर्वसन केंद्रात 1375 लोकांची आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER