विदर्भात पूरपरिस्थिती : नागपुरात एनडीआरएफच्या चार टीम दाखल

NDRF

नागपूर : मुसळधार पावसामुळे विदर्भातील अनेक धरणे भरल्याने नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. धरणांच्या परिसरातील गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला होता. मात्र पावसाचा जोर ओसरत नसल्याने येथील धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी पुण्यातून एनडीआरएफच्या चार टीम नागपूरमध्ये दाखल झाल्या आहेत.

नागपूर आणि चंद्रपूर परिसरातील पूरस्थिती असलेल्या भागांत ही पथके तैनात करण्यात येणार असल्याची माहिती आहे. नागपूरच्या कुही तालुक्यातील काही गावांना कन्हान नदीच्या पुराने वेढले असून या ठिकाणी एनडीआरएफच्या दोन टीम तर चंद्रपूर जिल्ह्यासाठी दोन टीम रवाना झाल्या आहेत.

संततधार पावसानंतर भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द आणि बावनथडी तर गोंदिया जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणी सोडल्याने भंडारा जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मध्यप्रदेशातील संजय सरोवर धरणाचे १० दरवाजे उघडण्यात आल्याने वैनगंगा आणि बाघ नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. परिणामी गोंदिया जिल्ह्यातील २० गावांना पुराने वेढा घातला असून तेथील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू आहे.

गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगेची पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे वैनगंगेच्या उपनद्यांना दाब निर्माण होऊन अनेक मार्ग बंद पडले आहेत. पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेकडो हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहेत. गडचिरोलीपासून सात किलोमीटरवर असलेल्या पाल नदीच्या पुराचे पाणी आल्याने गडचिरोली-आरमोरी तसेच गडचिरोली-चामोर्शी मार्ग बंद पडला आहे. चंद्रपूरमधील ब्रह्मपुरी येथील अनेक शेतांमध्ये वैनगंगेचे पाणी शिरले आहे. पिंपळगाव व चिखलगावात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER