फ्लॅशबॅक : पराभव कसा स्वीकारावा हे दाखवणारा ‘सवाल माझा ऐका’

Chandrakant Shindeमराठी चित्रपटसृष्टीला आता जरी घरघर लागली असली तरी एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टीने सर्वोत्कृष्ट चित्रपट देत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज दक्षिण भारतीय किंवा हॉलिवूडच्या चित्रपटाची नक्कल हिंदी चित्रपटसृष्टी करीत आहे. परंतु अनेक जुने मराठी चित्रपट असे आहेत ज्यांचे कथानक आजही दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये पाहायला मिळते. तरुण पिढीमध्ये आत्मविश्वास, महत्त्वाकांक्षा जागृत करण्याबरोबरच पराभव स्वीकारायची वेळ आलीच तर कसा स्वीकारावा असा चांगला संदेश देणारा चित्रपट आहे अनंत माने दिग्दर्शित- सवाल माझा ऐका.

ही बातमी पण वाचा:- संकटाला संधी बनवणं हाच एकमेव उपाय…

लॉकडाऊनच्या काळात वर्क फ्रॉम होम असल्याने घरीच राहून काम करीत करीत तिस-या पडद्यावर हिंदी, इंग्रजी, मराठीसह काही डब आणि काही मूळ भाषेतील दक्षिण भारतीय अनेक उत्तमोत्तम चित्रपटही पाहता आले. दोन दिवसांपूर्वी पुन्हा एकदा अरुण सरनाईक आणि जयश्री गडकर अभिनीत ‘सवाल माझा ऐका’ चित्रपट पाहिला. अगोदर हा चित्रपट पाहात असताना जे जाणवले नव्हते ते नव्याने जाणवले. हा केवळ एक तमाशाप्रधानच चित्रपट नाही तर त्यात एक खरोखर अनोखा मेसेजही देण्यात आलेला आहे. पराभव कसा स्वीकारावा हे अत्यंत नेमकेपणाने अनंत माने यांनी चित्रपटात दाखवले आहे. आपले अनेक मराठी चित्रपट केवळ मनोरंजनाच्या दृष्टीतूनच पाहण्यात आलेले आहेत; परंतु अनेक चित्रपटांत दिग्दर्शकांना समाजाला, व्यक्तींना चांगले संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

चित्रपट म्हणजे समाजाला जागे करणारे एक महत्त्वाचे माध्यम मानले जाते. अर्थात बॉलिवूडच्या काही निर्मात्यांचे म्हणणे, आम्ही येथे समाजाला सुधरवण्यासाठी नाही तर व्यवसाय करायला आलो आहोत, असे असल्याने त्यांच्याकडून आपण तशी अपेक्षा करणेही चुकीचेच आहे. मात्र मराठी निर्माते मनोरंजनासोबतच चांगले मेसेज देत आले आहेत आणि आताही देत आहेत.जवळ-जवळ ५६ वर्षांपूर्वी म्हणजे ऑगस्ट १९६४ मध्ये दिग्दर्शक अनंत माने यांनी ‘सवाल माझा ऐका’ चित्रपट सादर केला. या चित्रपटाचे कथानक अत्यंत साधे, सोपे आणि सहज समजणारे आहे; परंतु त्यातील संदेश हा खूप गंभीर, खोल आणि विचार करावयास लावणारा आहे. अर्थात कथा, पटकथा, संवादाचे संपूर्ण श्रेय हे प्रख्यात लेखक रणजित देसाई यांचे असले तरी अनंत माने यांनी कथा पडद्यावर खूपच उत्कृष्ट  उतरवली आहे. हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला होता आणि अनेक पुरस्कारही मिळवले होते. अर्थात यात सगळ्यात मोठा वाटा हा संगीतकार वसंत पवार यांनी जगदीश खेबूडकर यांच्या लिहिलेल्या गीतांना चढवलेल्या साजाचाही होता.

कसं काय पाटील बरं  हाय का?, सोळावं वरीस धोक्याचं आणि सवाल-जबाब, अशी एकूण ११ गाणी चित्रपटात आहेत. तमाशामधील सवाल-जबाबातून अट लागते. अट असते पराभव झाल्यास आयुष्यभर साडी नेसून राहण्याची आणि यात ज्योतीबा महागावकर या तमाशा मालकाला रघू  इटकर या तमाशा मालकाकडून पराभव पत्करावा लागतो. ज्योतीबा महागावकरची पत्नी या धक्क्याने मरते, छोट्या मुलीला आत्या गावी घेऊन जाते. ज्योतीबा  पुन्हा रघू  इटकरला आव्हान देतो; परंतु हृदयविकाराचा झटका आल्याने सामना पूर्ण होत नाही आणि ज्योतीबा मरतो. त्याची मुलगी अनु पित्याच्या मृत्यूचा बदला घेण्याचे ठरवते आणि नाचगाणे शिकू लागते. तमाशात शाहीर लागतो म्हणून ती ज्या जयवंताला शाहीर म्हणून विडा देते तो प्रतिस्पर्धी रघू इटकरचाच मुलगा असतो. शेवटी अनु आणि जयवंताचा सामना रंगतो. यात कोणाचा विजय होतो आणि तो कसा होतो हाच या चित्रपटाचा मुख्य विचार आहे. खरे तर हा खूप मोठा विचार आहे. आपल्या हातून अजाणतेपणी एखाद्यावर अन्याय झाल्याने त्याचे कुटुंब कसे वा-यावर पडते आणि यातूनच बदल्याची भावना निर्माण होते. तशी ती होऊ नये म्हणून स्वतः पराभव पदरी पाडून घेण्यातच खरा विजय आहे, असा सुंदर विचार रणजित देसाई यांनी मांडला.

दक्षिण भारतीयच काय अनेक हिंदी चित्रपटांमध्येही नायक ज्या नायिकेच्या किंवा नायिका ज्या नायकाच्या प्रेमात पडते  तो घराण्याच्या दुश्मनाचा मुलगा किंवा मुलगी असल्याचे कथानक पाहायला मिळते. दोघांचे प्रेम होते आणि शेवटी दोन्ही घराण्यांतील वैर संपते. मात्र रणजित देसाई यांनी ५६ वर्षांपूर्वीच असे कथानक तयार केले होते. मराठी चित्रपट काळाच्या पुढचे असत असे जे म्हटले जाते ते उगीचच नाही. ‘सवाल माझा ऐका’ हा केवळ तमाशापट नाही तर पराभव स्वीकारण्याची मानसिकता निर्माण करणारा चित्रपट आहे हे त्यामुळेच नव्याने जाणवले. तरुण पिढीमध्ये आत्मविश्वास, महत्त्वाकांक्षा जागृत करण्याबरोबरच पराभव स्वीकारायची वेळ आलीच तर कसा  स्वीकारावा, असा चांगला संदेश देणारा चित्रपट आहे. यू ट्यूबवर हा चित्रपट उपलब्ध असून त्याचा नक्कीच आस्वाद घ्यावा, असे यानिमित्ताने सुचवावे वाटते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER