फ्लॅशबॅक : शशिकला – मोलकरीण ते यशस्वी अभिनेत्री

Shashikala

एंट्रो- यशाच्या शिखरावरील व्यक्ती लगेच सगळ्यांच्या नजरेत भरते. परंतु यशाचे शिखर गाठण्यासाठी त्या व्यक्तीने केलेली मेहनत, कष्ट हे ठाऊक नसतात. त्यामुळे यशस्वी व्यक्ती किती नशीबवान आहे, असे उद्गार लगेचच तोंडातून बाहेर पडतात. शशिकला यांनी बॉलिवूडमध्ये नायिका, खलनायिका, नृत्यांगना, सहनायिका, खाष्ट सासू अशा अनेक भूमिका साकारत स्वतःला तावून सुलाखून काढले होते.

४ ऑगस्ट १९३२ ला मुंबईत जन्मलेल्या शशिकला यांनी ८८ वर्षे पूर्ण केली असली तरी त्यांच्याकडे पाहताना त्या इतक्या वृद्ध आहेत यावर विश्वासच बसत नाही. या वयातही त्यांनी आपला ग्रेस जपून ठेवला आहे. तरुणपणी त्या किती सुंदर असतील हे त्यांच्या आजच्या रूपावरून सहज लक्षात येते. त्यांचे जुने फोटो पाहिले तरी त्यांचे सौंदर्य थक्क करणारे असल्याचे स्पष्ट होते. परंतु  बॉलिवूडमध्ये  फक्त सौंदर्यच नव्हे तर मेहनत आणि नशीब या दोन्ही गोष्टींची साथ लागते आणि शशिकला यांना ही साथ चांगली मिळाली होती.

शशिकला यांचे वडील खूप श्रीमंत होते; परंतु त्यांच्या भावाने त्यांची सर्व संपत्ती हडप केली आणि जवळकर कुटुंब रस्त्यावर आले. शशिकलाला घेऊन तिचे वडील मुंबईला आले.  शशिकला यांची घरची परिस्थिती अत्यंत वाईट होती. घर चालवण्यासाठी त्यांना मोलकरणीचेही काम करावे लागले होते. खरे तर त्यांनी दुसरी कामे शोधण्याचा खूप प्रयत्न केला; परंतु कामे मिळाली नाहीत. त्यामुळे नाइलाजाने त्यांनी मोलकरणीचे काम करण्यास सुरुवात केली होती. चित्रपटात त्यांचा प्रवेश योगायोगानेच झाला. मुंबईत काम करीत असताना एकदा प्रख्यात अभिनेत्री, गायिका नूरजहां यांनी त्यांना पाहिले. शशिकला यांचे सौंदर्य पाहून त्या थक्क झाल्या आणि त्यांनी आपल्या पतीला सांगून शशिकला यांना चित्रपटात काम मिळवून दिले. हा चित्रपट होता झीनत. १९४५ मध्ये शशिकला यांनी या चित्रपटाच्या निमित्ताने तोंडाला जो रंग लावला तो आजपर्यंत उतरवलेला नाही. या पहिल्या चित्रपटासाठी त्यांना २५ रुपये बिदागी देण्यात आली होती.

ही बातमी पण वाचा : … अशा प्रकारे गायिकेची बनली कॉमेडियन!

‘झीनत’ चित्रपटानंतर सय्यद शौकत हुसैन रिझवी यांनी शशिकला यांना ‘जुगनू’ चित्रपटात अभिनेता दिलीपकुमारच्या बहिणीची भूमिका साकारण्याची संधी दिली. १९४७ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. यानंतर रिझवी यांनी शशिकला यांना नायिका बनवण्याचे ठरवले आणि चित्रपटाची तयारी सुरू केली. परंतु त्याच वेळेस देशाची फाळणी झाली. नूरजहां आणि रिझवी पाकिस्तानला परत गेले. दुसरे कोणी काम देणारे ओळखीचे नसल्याने शशिकला यांनी काम मिळवण्यासाठी संघर्ष सुरू केला. या दरम्यान त्यांनी डोली (१९४७), पगडी (१९४८), गर्ल्क स्कूल (१९४९) या चित्रपटांमध्ये छोट्या-मोट्या भूमिका साकारल्या. त्यांना नायिका म्हणून पहिली संधी रणजित मूव्हीटोनने ‘नजारे’ चित्रपटाद्वारे दिली. १९४९ ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात शशिकला यांचा नायक होता आगा. त्यानंतर मग त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या. तेव्हा स्टुडिओ  कलाकारांसोबत दोन-तीन चित्रपटांसाठी करार करीत असत. त्यामुळे शशिकला यांनी मागे वळून पाहिले नाही. नायिकेपेक्षा सहनायिका म्हणून त्यांनी सर्व मोठ्या कलाकारांबरोबर चित्रपट केले.

अभिनेत्री म्हणून यशस्वी झाल्यावर शशिकला यांनी प्रकाश सेहगल यांच्याबरोबर लग्न केले. परंतु लग्नानंतर पतीने त्यांना खूपच त्रास दिला. त्यामुळे शशिकला यांनी पहिल्या पतीला सोडले आणि आपल्या प्रेमीबरोबर लग्न करून त्या लंडनला गेल्या. परंतु दुस-या पतीनेही त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. त्यांना भयंकर शारीरिक इजाही केल्या. संसारातून मन उडालेल्या शशिकला यांनी संसार त्याग करण्याचा निर्णय घेऊन संन्यास घेण्याचे ठरवले. याच दरम्यान त्यांनी खलनायिकेच्या भूमिका साकारण्यासही सुरुवात केली. त्यांची खलनायिकेची इमेज त्यांच्या लोकप्रियतेच्या आड येत होती. सगळे जण त्यांच्याकडे खलनायिका म्हणूनच पाहात असत. यामुळे त्या खूप दुःखी झाल्या होत्या. यामुळे त्यांच्या मनावर परिणाम झाला. यातून सावरण्यासाठी त्यांनी इगतपुरी विपश्यना आश्रमात प्रवेश घेतला. त्या पूर्णपणे धार्मिक झाल्या. १९८८ मध्ये ‘घर घर की कहानी’ चित्रपटाच्या वेळेस त्यांच्या बाबतीत अशा काही घटना घडल्या की, त्यांना चित्रपटसृष्टी सोडून दूर कुठे तरी जावे असे तीव्रतेने वाटू लागले. आणि त्यांनी खरोखरच चित्रपटसृष्टी सोडली आणि त्या धार्मिक पर्यटनाला बाहेर पडल्या. त्यांनी चारधाम यात्रा केली. हृषीकेशच्या आश्रमात राहिल्या. परंतु खरी शांती द्वारकापुरी आणि गणेशपुरी आश्रमात मिळाल्याचं त्यांनीच एकदा सांगितलं होतं.

शशिकला यांची छोटी मुलगी शैलजा तेव्हा कलकत्त्यात राहात होती. मुलीच्या एका कौटुंबिक मित्राच्या मदतीने शशिकला मदर टेरेसा यांच्या आश्रमात पोहचल्या. परंतु एक तर त्या अभिनेत्री आणि दुसरी त्यांची खलनायिकेची इमेज. त्यामुळे त्यांच्याकडे ही बाई चांगली आहे या नजरेने कोणीच बघायला तयार नव्हते. त्यांच्या अनेक मुलाखती घेण्यात आल्या. शिशु भवन आणि पुण्याच्या आश्रमात त्यांना मानसिक रोगी, वृद्ध आणि कुष्ठरोग्यांची सेवा करण्यास सांगितले. यांचे प्रातर्विधीपासून सर्व कामे शशिकला यांनी केली. या कामाने त्यांच्या मनाला शांती मिळाली आणि त्या परीक्षेतही पास झाल्या. त्यानंतर तीन महिन्यांनी मदर टेरेसा यांच्याबरोबर त्यांची भेट झाली. तेव्हा त्या मदर टेरेसा यांना बिलगून खूप वेळ रडत होत्या. मदर टेरेसा यांच्या संस्थेसाठी काम करण्यास सुरुवात केली. गोरगरिबांची सेवा करणे हाच आपला धर्म, असे त्यांनी मानले होते. जवळ-जवळ नऊ वर्षे त्यांनी अशा प्रकारे समाजसेवा केली.

१९९३ ला त्या परत आल्या तेव्हा त्यांच्या मोठ्या मुलीला कॅन्सर झाल्याचे समजले. दोन वर्षांतच मुलीचे निधन झाले. मुलीच्या लहान मुलांना सांभाळण्याची जबाबदारी शशिकला यांनी उत्कृष्टपणे सांभाळली. याच दरम्यान त्यांनी मालिकांमध्येही काम करण्यास सुरुवात केली. जुनून, आह, सोनपरी, किसे अपना कहे आदी मालिकांमध्ये त्यांनी  काम केले. आज त्या लहान मुलगी आणि जावयाबरोबर सुखात राहात आहेत. त्या सध्या सुखात दिसत असल्या तरी त्यांनी जे काही भोगले आहे ते आपल्या चेह-यावर कधीही दिसू दिले नाही. आणि हाच त्यांचा खरा अभिनय म्हणता येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER