फ्लॅशबॅक : अमजद खान- गब्बरमुळे लोकप्रियतेचे शिखर गाठलेला अभिनेता

Gabber Singh-Flashback

एंट्रो- एखाद्या कलाकाराने आपल्या पहिल्याच चित्रपटात खलनायकाची कितीही चांगली भूमिका केली असेल तर त्याला कोणी स्वीकारतही नाही. अशी भूमिका करून घराघरात पोहोचण्याचे भाग्य फार कमी जणांना मिळते. एवढेच नव्हे तर पुढील पूर्ण कारकिर्दीतही पहिल्या चित्रपटात मिळालेले यश टिकवून ठेवणे तर आणखीन कठिण असते. असा पराक्रम करणारे बॉलिवुडमध्ये (Bollywood) हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच कलाकार आहेत. त्यात अमजद खानचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल.

ज्याच्या नशिबात जे लिहिलेले असते ते कोणीही त्याच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. अमजद खानच्या (Amjad Khan) नशिबात शोले चित्रपटातील गब्बर सिंहची (Gabber Singh) भूमिका लिहिलेली होती आणि म्हणूनच अनेकांनी ती भूमिका नाकारली आणि शेवटी नव्या असलेल्या अमजद खानच्या झोळीत पडली आणि त्याने त्या भूमिकेचे सोने म्हणण्यापेक्षा प्लॅटिनम केले असे म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल. (प्लॅटिनम हा सोन्यापेक्षा जास्त महाग असल्यानेच प्लॅटिनम म्हटले आहे.)  15 ऑगस्ट  1975 ला प्रदर्शित झालेल्या शोलेमध्ये (Shole) अमजद खानने साकारलेली गब्बरची भूमिका आज 45 वर्षानंतरही प्रेक्षकांच्या विशेषतः आजच्या तरुण पिढीलाही ठाऊक आहे. त्याने साकारलेली नकारात्मक भूमिका इतकी प्रभावी होती की पार्ले जी ने त्याला चक्क आपल्या बिस्किटाच्या जाहिरातीत वापरले आणि बिस्किटांचा खप वाढवला. हे यश खरोखर कल्पनातीत आहे.

अर्थात अभिनय हा अमजद खानच्या रक्तातच होता. अर्थात अनेक कलाकारांच्या रक्तातच अभिनय असतो आहे परंतु त्यांना अमजद खानप्रमाणे यश मिळाले नाही. 12 नोव्हेंबर 1940 ला पेशावरमधील पख्तुन कुटुंबात जन्म झालेला अमजद लहानपणापासूनच खोडकर होता. पन्नासच्या दशकातील प्रख्यात अभिनेते जयंत हे अमजदचे वडिल तर इम्तियाज आणि इनायत हे दोन भाऊही हिंदी चित्रपटात काम करीत होते. त्यामुळे लहानपणापासूनच अमजदने नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. फाळणीनंतर हे कुटुंब मुंबईत आले. अमजदचे शिक्षण वांद्रे येथील सेंट अँड्र्यू हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर नॅशनल कॉलेजमध्ये त्याने पुढील शिक्षण घेतले. कॉलेजमधील निवडणुकीत तो जिंकला आणि जनरल सेक्रेटरीही झाला होता. 1957 मध्ये अब दिल्ली दूर नहीं आणि माया चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम केल्यानंतर के. आसिफ यांच्या लव अँड गॉडमध्येही काम केले. के. आसिफ यांना सहाय्यक म्हणूनही अमजदने काम केले. यानंतर हिंदुस्तान की कसम नावाचा एक चित्रपटही केला. याच दरम्यान 1972 मध्ये शीलाबरोबर अमजदने लग्न केले. ज्या दिवशी अमजदने शोले साईन केला त्याच दिवशी पहिला मुलगा शादाबचा जन्म झाला. सीमाब हा मुलगा आणि  एहलम नावाची एक मुलगीही अमजद खानला आहे.

शोलेमध्ये अमजद खानची वर्णी योगायोगानेच लागली. संजीव कुमारने जेव्हा चित्रपटाची कथा ऐकली तेव्हा त्याने गब्बर सिंहची भूमिका मला दे अशी गळ निर्माता-दिग्दर्शक रमेश सिप्पी यांना घातली. तर रमेश सिप्पी यांना गब्बर सिंहची भूमिका डॅनीने करावी असे वाटत होते. डॅनीकडे डेट्स नसल्याने त्याने नकार दिला. कोणी कलाकार मिळत नसल्याने लेखक सलीम खान यांनी रमेश सिप्पी यांना अमजद खानचे नाव सुचवले आणि बॉलिवुडला एक अभिनेता मिळाला. अमजद खानने हिंदी चित्रपटातील पारंपरिक डाकूंच्या इमेजला छेद देऊन काऊ बॉयसारखे एक वेगळे रूप दिले.

खलनायकी भूमिका साकारतानाच अमजद खानने शतरंज के खिलाड़ी, दादा, कुरबानी, लव स्टोरी, याराना अशा काही चित्रपटांमध्ये चरित्र भूमिकाही साकारल्या. तसेच चोर पुलिस (1983) आणि अमीर आदमी गरीब आदमी (1985) या दोन चित्रपटांचे दिग्दर्शन करून दिग्दर्शनाचीही हौस भागवून घेतली होती. अमजद खान खूप दयाळू होता आणि अडले नडलेल्याला मदत करण्यास नेहमी तत्पर असे. स्वतः अमिताभनेच अमजद खानच्या या गुणाबद्दल सांगितले होते. अमिताभ आणि अमजद खानची जोडी खूप यशस्वी ठरली होती आणि वास्तव जीवनातही दोघे एकमेकांचे चांगले मित्र होते.

1976 मध्ये द ग्रेट गॅम्बलरच्या शूटिंगसाठी गोव्याला जाताना अमजद खानच्या गाडीला मुंबई-गोवा महामार्गावर भयंकर अपघात झाला. अमजद कोमात गेला होता. अमिताभने यावेळी अमजद खानला खूप मदत केली त्यामुळे तो लवकर बरा झाला परंतु औषधांमुळे त्याचे वजन वाढले आणि तो जाडा झाला. त्यानंतरही काही चित्रपट अमजदने केले परंतु त्यात पहिल्यासारखा जोश नव्हता. त्याने जवळ-जवळ 130 चित्रपट केले यात तामिळ चित्रपटांचाही समावेश आहे. 27 जुलै 1992 ला हृदयविकाराचा झटका आला आणि गब्बर सिंह अनंतात विलीन झाला. आजही गब्बर सिंहसारखा खलनायक झाला नाही असे म्हटले जाते आणि मला वाटते हीच अमजद खानच्या अभिनयाला मिळालेली खरी श्रद्धांजली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER