झेंडेवाला, बंगलेवाला आणि हुतात्मा….

Captain Sushant C Godbole Editorial

Shailendra Paranjapeसीमेवर जवान रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून सरहद्दीवर तैनात आहेत म्हणून आपण सारे आपापल्या घरी सुरक्षितपणे राहू शकतो. भारतीय लष्कराची गौरवशाली परंपरा आहे आणि ती कायम राखण्यात लष्करी अधिकारी तसेच जवानांच्या कुटुंबीयांचाही तितकाच मोलाचा वाटा आहे.

कारगिलमधे पाकिस्तानने केलेल्या घुसखोरीच्या काळात बॉर्डर हा हिन्दी चित्रपट प्रदर्शित झाला आणि खूपच गाजला. त्यातलं `संदेसे आते है, हमे तडपाते है…’ हे गाणं लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलं आणि आजही स्वातंत्र्यदिन (Independence Day) असो की प्रजासत्ताकदिन (Republic Day), हे गाणं हमखास ऐकू येतंच.

भारतीय लष्कराच्या कर्तव्यपरायणतेबद्दल, अधिकारी-जवान यांच्या त्यागाबद्दल सर्वसामान्य जनतेनं खरे तर कायमच ऋणी रहायला हवं पण त्याबद्दलची तितकीशी जाणीव सर्वसामान्य लोकांमधे दिसून येत नाही. त्यासाठीच हा प्रसंग मुद्दाम लिहित आहे.

सीमेवरचे वातावरण तापले होते आणि पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) पंतप्रधान असताना कारगिलच्या (Kargil) पार्श्वभूमीवर ऑपरेशन पराक्रम हाती घेण्यात आले होते. त्या काळात वातावरण निवळल्यानंतर सरहद्दीवरच्या भागात शत्रूला लक्ष्य करण्यासाठी पेरलेले भूसुरुंग काढून टाकण्याचे काम सुरू होते. पुण्यातल्या सदाशिव पेठेत बालपण घालवलेला सुशांत चंद्रकांत गोडबोले हा तरुण भारतीय लष्करात इंजिनियर रेजिमेंटमधे दाखल झालेला होता.

सुशांत गोडबोले (Sushant Godbole) २००० साली २२ व्या वर्षी चेन्नईच्या अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनीतून लष्करी सेवेत लेफ्टनंट पदावर दाखल झाले आणि भूसुरुंग कामी करण्याच्या मोहिमेच्या वेळी २००३ साली २६ वर्षींय सुशांत कँप्टन पदावर  होते. रणगाडाविरोधी २४ भूसुरुंग दोन दिवसात निकामी केल्यानंतर सुशांत गोडबोले यांनी भूसुरुंग निकामी करताना झालेल्या स्फोटात जम्मू येथे देशासाठी हौतात्म्य पत्करले. कँप्टन सुशांत यांचा मृत्यू २९ जानेवारी २००३ या दिवशी झाला आणि स्थानिक नगरसेवक उदय जोशी यांच्या पुढाकारने महापालिकेच्या महाराणा प्रताप उद्यानात सुशांत गोडबोले यांचे स्मारक उभारण्यात आले.

सुशांत यांचे वडील चंद्रकांत गोडबोले दरवर्षी पुण्यामधे महाराणा प्रताप उद्यानात उभारलेल्या या स्मारकापाशी आदरांजलीचा कार्यक्रम आयोजित करतात. माजी आमदार दीपक पायगुडे यांनी सुरू केलेल्या सैनिकी शाळेचे विद्यार्थी दरवर्षी या हुतात्मा सुशांत गोडबोले स्मारकापाशी संचलनाने मानवंदना देतात. यंदा करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सामूहिकपणे कार्यक्रम न करता गोडबोले कुटुंबीय आणि त्यांच्या निकटच्या मंडळींनी हुतात्मा सुशांत यांना फुलं वाहून वंदन केलं.

दरवर्षी प्रजात्ताक दिनानंतर तीनच दिवसांनी हा कार्यक्रम होतो. सुशांत गोडबोले यांचे वडील चंद्रकांत गोडबोले रिक्षावाल्यांच्या प्रश्नांवर हिरिरीने भांडणारे आणि त्यांच्या प्रश्नांमधे उपाय शोधताना व्यवस्थेत बदल घडवून आणण्याचे काम गेली चार दशकांहून अधिक काळ करीत आहेत. दोन तीन वर्षांपूर्वी २९ जानेवारीच्या एक दोन दिवस आधी घडलेला हा प्रसंग त्यांनी सांगितला आणि त्यातून देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सुशांतसारख्या अनेक अनाम वीरांच्याही प्रती आपला समाज काय भावना ठेवतो, याची साक्ष पटली आणि खंतही वाटली. एक सुखद आणि एक दुःखद असा अनुभव त्या दोन दिवसात आला.

बागेबाहेर फूटपाथवर राहून प्रजासत्ताकदिनाला भिरभिरे असलेले कागदी झेंडे विकणारा कफल्लक माणूस चंद्रकांत गोडबोले यांना भेटला. त्याच्याकडे असलेल्या झेंड्यांबद्दल गोडबोले यांनी विचारणा केली. प्रजासत्ताकदिन तर होऊन गेलाय, आता कशाला हवेत झेंडे, असं त्या माणसानं विचारलं. बागेत माझ्या मुलाचे स्मारक आहे आणि तो काय प्रसंगात मरण पावला हे चंदूकाकांनी सांगितल्यावर तो एरवी कफल्लक पण मनाने श्रीमंत असलेला माणूस म्हणाला, बाबा तुझा पोरगा देशासाठी शहीद झालाय आणि मी काय तुझ्याकडून पैसं घेऊ व्हय…. बागेतल्यांच कार्यालयात झेंडे ठेवण्याची व्यवस्था करून कार्यक्रमाच्या वेळीही त्या माणसाने झेंडे लावायला मदत केली.

प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या वेळी ध्वनिक्षेपकावरून देशभक्तीचे गाणे ऐकून माझ्या ओळखीचे एक उच्चभ्रू गृहस्थ दुचाकी थांबवून माझ्याशी बोलू लागले. ते पंचाहत्तरीचे आणि कॉर्पोरेट सेक्टरमधून गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीतून करिअरमधून निवृत्त झालेले. शहराच्या मध्यवस्तीत स्वतःच्या बंगल्यात राहणारे. जाता जाता गाणं ऐकून थांबले आणि बागेत काय चाललंय, ते मी त्यांना सांगितल्यानंतर, हो का… इतकंच बोलून घरी निघून गेले.

बंगल्यापासून हाकेच्या अंतरावर असलेले स्मारक कोणाचे आहे, ते का उभारले आहे, या हुतात्म्याचे आपल्या जीवनातले स्थान काय, हे कोणतेही प्रश्न कॉर्पोरेट अफेअर्समधले नसल्याने ते सुखवस्तू निवृत्त आजोबा शांतपणे निघून गेले. त्याउलट स्वतःचं घर छप्पर नसलेला आणि फूटपाथवर राहणारा झेंडेवाला हौतात्म्याचं मोल जाणून पुढे येता झाला…

नकली लोकांपेक्षा असली लोकांना कँप्टन सुशांत आणि अशा सर्वच अनाम वीरांची आठवण आहे. म्हणूनच भारत श्रीमंत आहे. सुशांत आणि हे सारे वीर झेंडेवाले, बंगलेवाले असा भेद न करता साऱ्या देशवासियांसाठी सर्वोच्च त्याग करतात, याची जाणीव ठेवायला हवी. झेंडेवाल्याची संवेदना आणि जाणीव बंगलेवाल्यांना येवो तरच हुतात्म्यांची बलिदानं कारणी लागतील.

Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER