
नवी दिल्ली: ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांच्यापाठोपाठ आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. पक्षात कुणालाही कोणतंही पद दिलं जातं. त्यामुळे पक्षाची कामगिरी अत्यंत वाईट झाली आहे. फाईव्ह स्टार कल्चरने निवडणुका जिंकता येत नाहीत. त्यासाठी आपण कामाची पद्धत बदलायला हवी, अशा शब्दांत गुलाम नबी आझाद ( gulam nabi Azad) यांनी आपल्याच पक्षाच्या नेतृत्वाला खडेबोल सुनावले आहेत.
गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या फाईव्ह स्टार कल्चरवरही हल्लाबोल केला. कोणतीही निवडणूक फाईव्ह स्टार कल्चरने लढवली जात नाही. आज नेत्यांना तिकीट मिळताच ते फाईव्ह स्टार हॉटेल बुक करतात. जोपर्यंत पक्षातील हे फाईव्ह स्टार क्लचर बदललं जात नाही. तोपर्यंत निवडणुका जिंकता येणार नाहीत, असं गुलाम नबी आझाद म्हणाले. यावेळी आझाद यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांवरही हल्लाबोल केला. पदाधिकाऱ्यांना आपली जबाबदारी समजली पाहिजे. जोपर्यंत पक्षात पदाधिकारी नियुक्त केले जातील तोपर्यंत हे असंच चालणार. पक्षांतर्गत निवडणुका घेऊन पदाधिकारी निवडून आले तरच त्यांना त्यांची जबाबदारी समजेल. आता तर पक्षात कुणालाही कोणतंही पद दिलं जातं, असंही ते म्हणाले.
देशात कोरोना साथीमुळे गांधी कुटुंबीयांना मनाजोगते काम करता आले नाही. त्यामुळे मी त्यांना क्लिन चीट देतो. मात्र काँग्रेस नेतृत्वाकडे याआधी केलेल्या मागण्यांत आम्ही काहीही बदल केलेला नाही. त्यातील अनेक मागण्या पक्षनेतृत्वाने मान्य केल्या आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला