गणपतीपुळे येथे समुद्रात पाच जण बुडाले; चार सुखरूप, एक अत्यवस्थ

Five drowned at Ganpatipule; Four safe one emergency

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे समुद्रात आंघोळीसाठी उतरलेल्या अति उत्साही आठ तरुणांपैकी पाच जण बुडाले. सुदैवाने तेथील जीवरक्षक, ग्रामस्थ आणि पोलीस यांच्या शर्थीच्या प्रयत्नाने पाचही तरुणांना वाचविण्यात यश आले. कोल्हापूर, बांबवडे, शिराळा आदी भागांतील हे तरुण आहेत.

आज दुपारी ही घटना घडली. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. अनलॉकनंतर जिल्हाबंदी उठविण्यात आली. त्यानंतर गेल्या महिन्यापासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे योग्य ती खबरदारी घेऊन सुरू करण्यात आली. त्यामुळे आठ महिने घरात बसून कंटाळून गेलेले लोक आता पर्यटनासाठी बाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे तीर्थक्षेत्र गणपतीपुळेत मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी दिसू लागली आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील आठ तरुण देवदर्शन आणि पर्यटनासाठी गणपतीपुळ्यात आले होते. सुरज धनाजी कदम (वय २०, रा. साने गुरुजी वसाहत बांबवडे, जि. कोल्हापूर), हर्षद बाजीराव कांबळे (वय २० रा. कोल्हापूर), सौरभ उत्तम खोत (वय २१, देववाडी तालुका शिराळा), ओमकार ईश्वर पाटील (वय १९, झुंगुर कोल्हापूर), कृष्णा तुकाराम पाटील (कोल्हापूर), अतुल श्यामराव खोत (कोल्हापूर), केतन संभाजी परीट आणि नितीन पाटील अशी त्यांची नावे आहेत. सकाळी ९ वाजता देवदर्शन आटोपून दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अति उत्साहाच्या भरात समुद्रात पोहण्यासाठी उतरले.

आठ जण पोहत असताना त्यापैकी पाच जणांना पाण्याचा अंदाज न आल्याने गटांगळ्या खात बुडू लागले. हे येथील स्थानिक पोलीस व जीवरक्षक यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. जीवरक्षक आशिष माने, विक्रम राजवाडकर,अक्षय माने, विशाल निंबरे, सुयोग पाटील, वीरेन सुर्वे, पोलीस कॉन्स्टेबल  सरगर व हवालदार  लोहलकर यांच्या  सहकार्याने पाचही जणांचे प्राण वाचविण्यात यश आले. त्यापैकी सुरज कदम याची प्रकृती गंभीर होती. त्याला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र आता त्याची प्रकृती स्थिर आहे. देवस्थानच्या रुग्णवाहिकेने त्यांना हलवले. सर्व वर्गमित्र फिरण्यासाठी आले होते. एकाची प्रकृती गंभीर,चार जण ठणठणीत आहेत.


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER