काटाजोड लढतीने कोल्हापुरात चुरस

Vidhansabha 2019

कोल्हापूर : जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघांत १०६ उमेदवार नशीब आजमावत आहेत. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडीसह बंडखोर उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात बंडखोरीचे निशाण  कायम राहिल्याने रणधुमाळी गाजली.  यापार्श्वभूमीवर जिल्ह्यात विक्रमी संख्येने मतदान झाले. सर्वच मतदार संघात दुरंगी आणि तिरंगी काटाजोड सामना रंगल्याने निकालाबाबत उत्सुकता ताणली आहे.

ही बातमी पण वाचा : पुणे पदवीधर निवडणुकीचे नगारे वाजू लागले

शहर उत्तरमध्ये शिवसेनेचे आ. राजेश क्षीरसागर, काँग्रेसचे चंद्रकांत जाधव व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. सतीशचंद्र कांबळे यांच्यासह नऊ उमेदवार असले तरी खरी लढत आ. क्षीरसागर व जाधव यांच्यातच झाली. शिवसेना-भाजप युती झाल्याने जाधव यांनी ऐनवेळी काँग्रेसकडून लढण्याचा निर्णय घेतला.आ. सतेज पाटील यांच्यासह शिवसेनेच्या एका गटाने जाधव यांना बळ दिले. आ. क्षीरसागर यांची हॅटट्रीक होणार की शिवसेनेचा बालेकिल्ला पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघात पारंपारिक राजकीय विरोधक महाडीक आणि सतेज पाटील कुटुंबियातील उमेदवारांतच झाली. आठ उमेदवार रिंगणात असले तरी भाजपचे आ. अमल महाडीक व काँग्रेसचे ऋतुराज पाटील यांच्यात हाय होल्टेज लढत ठरली. अमल व ऋतुराज मैदानात असले तरी काँग्रेसचे आ. सतेज पाटील व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडीक यांनी निवडणुक प्रतिष्ठतेची केली. राज्यात लक्षवेधी ठरलेल्या दक्षिणेत ७४ टक्के मतदान झाले आहे.

करवीर विधानसभा मतदारसंघात आठ उमेदवार रिंगणात होते. शिवसेनेचे आ. चंद्रदीप नरके, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्यातच काटाजोड लढत झाली. गेल्यावेळी फक्त ७१० मतांनी निकाल लागल्याने यंदाच्या निकालाबाबत कमालीची उत्कंठा लागली आहे. फोडाफोडीचे राजकारण, राजकीयदृष्ट्या एकमेकांना कोंडीत पकडण्यासाठी झालेले प्रयत्न यामुळे खळबळ उडाली. करवीर तालुक्यात ८२ टक्के मतदान झाल्याने जिल्ह्यातील ही हॉटस्पॉट लढत ठरणार आहे.

शिरोळ विधानसभा मतदारसंघात २५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १६ जणांनी माघार घेतली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माघारीचे आवाहन करुनही राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी उमेदवारी कायम ठेवली होती. शिवसेनेचे आ. उल्हास पाटील, स्वाभिमानीचे सावकर मादनाईक यांच्यासह पाटील-यड्रावकर, यादव, प्रमोद पाटील यांच्यात बहुरंगी लढतीत ७२ शिरोळकरांनी मतदान केले. निकालानंतर येथील राजकीय गणितं नव्याने मांडली जाणार आहेत .

चंदगडमध्ये भाजपचे बंडखोर भरमूअण्णा पाटील, गोपाळराव पाटील, ॲड. हेमंत कालेकर, शिवसेनेचे बंडखोर प्रभाकर खांडेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र गड्यान्नवार, बाळासारम फडके, जनता दलाच्या स्वाती कोरी यांनी माघार घेतली तरी १४ उमेदवार रिंगणात होते. भाजपचे बंडखोर रमेश रेडेकर व अशोर चराटी यांनी अर्ज मागे न घेता रिंगणात राहिले. राष्ट्रवादीचे राजेश पाटील, शिवसेनेचे संग्राम कुपेकर, भाजपचे बंडखोर शिवाजीराव पाटील, रेडेकर, चराटी, वंचित बहुजन आघाडीचे अप्पी पाटील यांच्यात बहुरंगी लढत झाली. तालुक्याच्या राजकारणाची नव्याने मांडणी करणारी ही निवडणुक ठरणार आहे.

शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात अकरा उमेदवार असले तरी शिवसेनेचे आ. सत्यजित पाटील-सरूडकर व जनसुराज्य पक्षाचे संस्थापक विनय कोरे यांच्यातच अतितटीची लढत झाली. मागील निवडणुकीत कोरे फक्त ३८८ मतांनी पराभूत झाले होते. काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत शेकापचे भारत पाटील किती मते घेणार? यावर विजयाचे गणित ठरणार आहे.

हातकणंगले विधानसभा मतदारसंघात १६ उमेदवार रिंगणात होते. शिवसेनेचे आ. डॉ. सुजित मिणचेकर, काँग्रेसचे राजू आवळे, जनसुराज्यचे अशोक माने, ताराराणी आघाडीचे किरण कांबळे, अपक्ष माजी आ. राजीव आवळे अशी बहुरंगी लढत झाली. बहुरंगी लढतीचा फायदा नेमका कोणाला होणार ते निकालानंतर स्पष्ट होईल.

राधानगरीत मतदारसंघात शिवसेनेचे आ. प्रकाश आबिटकर, राष्ट्रवादीचे के. पी. पाटील, अपक्ष गोकुळचे संचालक अरूण डोंगळे, राहूल देसाई, सत्यजित जाधव, चंद्रकांतदादा पाटील-कौलवकर आदीसर इतर असे १२ उमेदवार रिंगणात होते. भाजपचे देसाई, काँग्रेसचे डोंगळे, जाधव यांनी बंडखोरी केली. बहुरंगी लढत होणार असल्याने कोण किती मते घेणार त्यावरच विजयाचे गणित अवलंबून असणार आहे.

कागलमध्ये राष्ट्रवादीचे आ. हसन मुश्रीफ यांच्याविरूध्द एकच तुल्यबळ उमेदवार देण्याचे भाजपचे प्रयत्न महायुतीच्या जागा वाटपानंतर फसले. मुश्रीफ, शिवसेनेचे संजय घाटगे, अपक्ष समरजिसिंह घाटगे अशी तिरंगी लढत झाली. तिरंगी लढतीत ८१ टक्के चुरशीने मतदान झाले. राजकारणाचे विद्यापीठ म्हणून परिचित असलेल्या कागलात बाजी कोण मारणार याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे.

इचलकंरजीत १४ उमेदवार रिंगणात होते. भाजपचे आ. सुरेश हाळवकरण व अपक्ष प्रकाश आवाडे या पारंपारीक विरोधकात खरी लढत झाली. हाळवणकर यांची हॅटट्रीक होणार की आवाडे यांना अपक्ष म्हणून यश मिळणार हे लवकरच स्पष्ट होईल.