प्रथमेश परबचा ‘ओह माय घोस्ट्’ १२ फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये येणार

प्रेमळ भूतांवर आजवर हिंदी आणि मराठीत अनेक सिनेमे तयार झाले आहेत. हिंदीत तर अमिताभच्या भूतनाथपासून किंग अंकलपर्यंत अनेक सिनेमांचा समावेश आहे. तसेच मराठीतही अशा भूतांवर आधारित सिनेमे तयार झालेले आहेत. पण मराठीतील एकाही भूतपटाला म्हणावे तसे यश मिळालेले नाही. तरीही अनेक निर्माते भूतपट तयार करण्याचा प्रयत्न करतात. टकाटक, टाईमपास, झिपऱ्या, खिचिक, बीपी अशा चित्रपटांमधून अभिनयाची क्षमता दाखवणारा प्रथमेश परब आता एका विनोदी हॉरर सिनेमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘ओह माय घोस्ट’ (Oh My Ghost) असे या सिनेमाचे नाव असून तो 12 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये रिलीज केला जाणार आहे.

‘जम्पिंग टोमॅटो मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘फिल्मोशन पिक्चर्स’ यांच्यासह निर्माते सना वसिम खान आणि रोहनदीप सिंग यांनी एकत्रितपणे ‘ओह माय घोस्ट्’ या विनोदी सिनेमाची निर्मिती केली आहे. वसिम खान हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि छायाचित्रकार आहेत. मोहसीन चावडा हे या सिनेमाचे लेखक आणि संवादलेखक आहेत. संगीत आणि गायन रोहित राऊत यांचे आहे तर पार्श्वसंगीत सत्या, माणिक आणि अफसर यांचे आहे. या सिनेमात प्रथमेश परबसोबत काजल शर्मा, पंकज विष्णू, कुरूस देबू, प्रेम गाढवी, दिपाली पाटील आणि अपूर्वा देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे शूटिंग औरंगाबाद येथे करण्यात आलेले आहे.

‘ओह माय घोस्ट्’ हा विनोदी भूतपट असून यात जग्गू नावाच्या एका अनाथ मुलाची कथा सांगण्यात आलेली आहे. जीवनात आपण काहीच मिळवू शकलो नाही, अशा हताश मनस्थितीत असताना त्याला स्वप्नात भुते दिसू लागतात. आपण दुर्देवी आणि अभागी असल्याने आपल्या बाबतीत असे होते आहे, असे त्याला वाटू लागते आणि त्याच्या जीवनातील समस्या अधिक गुंतागुंतीच्या होतात. जग्गूला स्वतःचे आयुष्य आधीच ओझे वाटत असताना आता त्याला या भुताखेतांच्या विश्वाला सामोरे जावे लागते. या भुतांच्या माऱ्यातून सुटका करून घेण्यासाठी तो अनेक क्लृप्त्या करतो आणि हे करत असताना त्याला जीवनातील इतर अंगांचा साक्षात्कार होतो. त्यातून त्याचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो आणि नवीन पहाट त्यांच्या जीवनात येते. असे कथानक यात दाखवण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER